कुणालकडे होते दोन आयफोन! नातेवाईकांनी दिली माहिती, आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट
छत्रपती संभाजीनगर येथील खवडय़ा डोंगरावरून कुणाल चांदगुडे या मुलाने शुक्रवारी उडी घेतली. त्याला वाचवताना वडिलांचाही तोल गेला आणि त्यांना डोंगरावरून कोसळताना पाहून आईने पाठोपाठ उडी घेतली. तिघेही उंच कडय़ावरून खोल खाणीमध्ये पडले. खडकावर आदळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. आयफोनचे हप्ते परवडत नव्हते म्हणून ही घटना घडल्याची चर्चा रंगली आहे. मात्र चांदगुडे कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी हा दावा फेटाळून लावला. कुणालचे कुटुंब सधन होते. त्याच्याकडे आधीच दोन आयफोन होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. तसेच कुणाल अभ्यासात हुशार होता. त्याला दहावीत 92 टक्के गुण पडले होते. तो नीट परीक्षेची तयारी करत होता, अशी माहितीही समोर आली आहे.
कुणाल चांदगुडेच्या मावशीच्या पतीने आयफोनचा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले, कुटुंबात वाद होता. आई-वडिलांना समजूत द्यायची होती. आई-वडिलांना फक्त भीती द्यायची होती. त्यामुळे तो कडय़ावर गेला, पण अचानक तोल गेला आणि सर्व जण खाली पडले. होत्याचं नव्हतं झालं.
कुणालच्या दुसऱ्या मावशीच्या पतीने सांगितले की, ‘आई-वडिलांनी पोरांवर अशी वेळ येऊ दिली नाही पाहिजे. पती-पत्नीला एकमेकांचे बोलणे टोचायचे. लहानमोठे वाद होते, पण फार मोठे वाद नव्हते. कुणाल शाळेत खूप हुशार होता.
कुणालने आयफोनचे हप्ते थकवल्याने आत्महत्या केली असल्याचा दावा केला जातोय. या दाव्यावर त्याचे काका म्हणाले, ‘त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यांची शेती वगैरे आहे. नीट परीक्षेच्या क्लाससाठी तीन लाख रुपये भरले होते. त्याच्याकडे दोन आयफोन आहेत. त्यांच्याकडे कुत्रा आहे, त्याचाच महिन्याचा खर्च 7 ते 8 हजार रुपये आहे.’
Comments are closed.