भाजपला सोबत घेऊन समीर भुजबळ शिवसेनेला हादरा देणार; नाशकात भुजबळ विरुद्ध कांदे संघर्ष पुन्हा पेट
समीर भुजबळ विरुद्ध सुहास कांदे: नाशिक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, येवला, नांदगाव आणि मनमाड या नगरपालिकांमध्ये पुन्हा एकदा जुना समीर भुजबळ विरुद्ध सुहास कांदे (Sameer Bhujbal vs Suhas Kande) संघर्ष पेटण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी भाजपसोबत (BJP) हातमिळवणी करण्याचे संकेत दिल्याने राजकीय समीकरणे चांगलीच तापली आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपमध्ये युतीबाबत चर्चा सुरू असून, मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि समीर भुजबळ यांची नाशिकमध्ये बैठक झाली आहे. या बैठकीत नगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीची नाशिकमध्ये युती होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sameer Bhujbal: काय म्हणाले समीर भुजबळ?
समीर भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, सध्या नगरपालिका निवडणूक घोषित झाल्यात. खासकरून नांदगाव, मनमाडमधील कार्यकर्त्यांची भावना आहे की, एकत्र लढले पाहिजे. त्याचा आढावा गिरीश महाजन यांना दिला आहे. येवल्यात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येण्याची मागणी करत आहेत. त्यानुसार ते त्याच्या लोकांशी बोलत आहेत. उद्या पुन्हा मुंबईमध्ये आम्ही भेटणार आहोत. येवल्यात नगराध्यक्ष पदासाठी आम्ही प्रमुख दावेदार आहोत. नगराध्यक्ष पद आम्ही घेऊ. येवला नांदगाव आमच्याकडे आणि मनमाड भाजपकडे अशी चर्चा झाली आहे. येवल्यात स्वबळावर तयारी सुरू आहे. काही लोकांची म्हणणे आहे की, भाजप सोबतच लढा. येवल्यात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद नाही. नांदगाव, मनमाडमध्ये ते आमचे विरोधक आहेत. त्यामुळे त्यांना सोबत घेण्यात उपयोग नाही, असे म्हणत त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्यावर निशाणा साधला.
Sameer Bhujbal vs Suhas Kande: भुजबळ विरुद्ध कांदे संघर्ष पुन्हा उफाळणार
त्यामुळे नांदगाव आणि मनमाड भागात पुन्हा एकदा समीर भुजबळ विरुद्ध आमदार सुहास कांदे असा संघर्ष पेटणार असल्याचे पाहायला मिळत आहे. नांदगाव विधानसभा निवडणुकीत सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ यांच्यात सामना रंगला होता. या निवडणुकीच्या काळात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. तसेच समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले होते. सुहास कांदे यांनी बोलविलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवले होते. समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना घेऊन चाललेली बस अडवली. यानंतर सुहास कांदे तिथे आले असता त्यांनी थेट समीर भुजबळांना मारून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे भुजबळ आणि कांदे वादाची संपूर्ण राज्यभरात चर्चा रंगली होती. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ विरुद्ध कांदे वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Girish Mahajan: गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
तर याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत. सुहास कांदे आणि समीर भुजबळ हे दोघेही भेटले आहेत. सुहास कांदे आणि भुजबळ यांनी किती प्रेमाचे सबंध आहेत हे आपल्याला माहिती आहे. आम्ही दोघांना सोबत घेऊन मधला मार्ग काढणार आहोत. उद्या याबाबतीत निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यामुळे आता नेमका काय निर्णय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.