सम्राट चौधरी यांची बिहारच्या गृहमंत्रीपदी नियुक्ती
नितीश कुमार यांनी केले मंत्रिमंडळाचे खातेवाटप : अर्थ खाते संयुक्त जनता दलाकडे
वृत्तसंस्था / पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे खातेवाटप घोषित केले आहे. त्यांनी स्वत:कडे असणारे गृहमंत्रीपद यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना दिले आहे. तर भारतीय जनता पक्षाकडे असणारा अर्थविभाग यावेळी संयुक्त जनता दलाचे बिजेंद्रप्रसाद यादव यांच्याकडे देण्यात आला आहे. आणखी एक उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांना महसूल, भूमीसुधारणा तसेच खाणी आणि भूगर्भशास्त्र हे महत्वाचे विभाग देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वत:कडे सामान्य प्रशासन, मंत्रिमंडळ सचिव विभाग आणि दक्षता विभाग ठेवले आहेत.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व घटक पक्षांना प्रत्येकी काही महत्वाचे विभाग मिळतील अशी व्यवस्था मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केल्याचे दिसून येत आहे. यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला प्रचंड प्रमाणात जागा मिळाल्याने मंत्रीपदांसाठी मोठी स्पर्धा होती. तथापि, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विभागवाटप योग्य प्रकारे हाताळल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केली.
पक्षीय समतोल साध्य
बिहारच्या नव्या राज्यमंत्रिमंडळात भारतीय जनता पक्षाचे 14 मंत्री असून संयुक्त जनता दलाचे 8 मंत्री आहेत. इतर तीन पक्षांचा प्रत्येकी एक मंत्री आहे. भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला एकंदर 36 पैकी 17 मंत्रिपदे देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यांच्यापैकी 14 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. संयुक्त जनता दलाच्या वाट्याला 15 मंत्रिपदे आहेत. या पक्षाने 8 मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. लोकजनशक्ती पक्षाला दोन मंत्रीपदे असून एकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन छोट्या पक्षांना प्रत्येकी एक मंत्रीपद असून तशी नियुक्ती झाली आहे.
आता उत्सुकता विधानसभा अध्यक्षपदाची
नव्या विधानसभेचे अध्यक्षपद कोणाला मिळणार, हा आता औत्सुक्याचा विषय आहे. हे पद मागच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाकडे होते. यावेळी भारतीय जनता पक्षाने गृहमंत्रीपद आणि विधानसभा अध्यक्षपद या दोन्ही पदांसाठी प्रयत्न केले आहेत. त्यांपैकी गृहमंत्रीपद त्याला देण्यात आले आहे. आता विधानसभा अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार हा चर्चेचा विषय बनला आहे. सध्या या पदासाठी भारतीय जनता पक्षाचे आठ वेळा विधानसभा सदस्य असणारे प्रेम कुमार यांनी नियुक्ती होईल, अशी चर्चा आहे. या पदासंबंधीची घोषणा काही काळातच करण्यात येईल, लवकरच नव्या बिहार विधानसभेचे अधिवेशनही होणार आहे.
नवे मंत्री आणि त्यांचे विभाग
संयुक्त जनता दल
- मुख्यमंत्री नितीश कुमार- सामान्य प्रशासन, मंत्रिमंडळ सचिवालय, दक्षता
- श्ऱवण कुमार- ग्रामीण विकास, वाहतूक
- अशोक चौधरी- ग्रामीण कामे
- विजय चौधरी- इमारत बांधकाम, जलस्रोत, विधिमंडळ कामे
- मदन साहनी- समाजकल्याण
- बिजेंद्र प्रसाद यादव- अर्थ, व्यापारी कर
- मोहम्मद झमा खान- अल्पसंख्याक कल्याण
- विजेंद्र यादव- ऊर्जा
- लेसी सिंग- अण्णा, ग्राहक संरक्षण
भारतीय जनता पार्टी
- उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी- गृह
- उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा- महसूल, भूसुधारणा, खाणी, भूगर्भशास्त्र
- श्रेयसी सिंग- क्रीडा, तंत्रज्ञान
- अरुण शंकर प्रसाद- पर्यटन
- संजय वाघ- कामगार संसाधन संसाधने
- मंगल पांडे- आरोग्य, कायदा
- दिलीप जयस्वाल- उद्योग
- नितीन नबिन- रस्ते बांधकाम, नगर विकास, गृहबांधणी
- राम कृपाल यादव- शेती
- सुनिल कुमार- शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, तांत्रिक शिक्षण
- सुरेंद्र मेहता- पशुसंवर्धन, मस्त्यविकास स्रोत
- रमा निषाद- मागासवर्गीय, अतिमागासवर्गीय कल्याण
- लाखेंद्र कुमार रोशन- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती कल्याण
- प्रमोदकुमार चंद्रवंशी- सहकार
लोकजनशक्ती (रापा)
- संजय कुमार पासवान- साखर उद्योग
- संजय कुमार सिंग- सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी
हिंदुस्थान अवाम मोर्चा
- संतोष कुमार सुमन- लहान जलस्रोत
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
- दीपक प्रकाश- पंचायत राज
Comments are closed.