संगमेश्वरच्या करजुव्यात वाळूमाफियांचा हैदोस; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तस्करांची संख्या वाढली
संगमेश्वर तालुक्यात वाळूमाफियांचा हैदोस सुरु आहे. प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे वाळूमाफियांचे आयतेच फावले आहे. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथील वातवाडी आणि सुतारवाडी हे वाळूमाफियांचे अड्डे बनले आहेत. हे वाळूमाफियांचे अड्डे प्रशासन उद्ध्वस्त का करत नाही? की वाळूमाफियांना प्रशासनाचाच वरदहस्त आहे का? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. या वाळूमाफियांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.
गेल्या काही वर्षात संगमेश्वर तालुक्यात वाळूमाफियांनी आपले बस्तान बसवले आहे. करजुवे येथील वातवाडी आणि सुतारवाडीमध्ये चार ते पाच वाळूमाफिया दररोज बेसुमार वाळू उत्खनन करत आहेत. पुर्वी या परिसरात एक दोन माफिया वाळू उपसा करत होते. आता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळूमाफियांची संख्या वाढली आहे.
वाशूमाफियांची संख्या वाढत असताना प्रशासनाची कारवाई थंडावली आहे. संध्याकाळनंतर या वाळूमाफियांचे उद्योग सुरु होतात. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाळूची वाहतूक केली जाते. ही बेकायदेशीर वाळू वाहतूकही पोलिसांना सापडत नाही हा चिंतेचा विषय आहे.
तात्पुरत्या कारवाईमुळे वाळूमाफियांचे फावते
संगमेश्वर तालुक्यात करजुवे परिसरात होणाऱ्या वाळूउपशावर तहसीलदाराकडून एखादी कारवाई झाली तर जेमतेम आठवडाभर वाळू उत्खनन थांबते आणि त्यानंतर पुन्हा वाळूमाफिया सक्रीय होतात. वाळूमाफियांच्या विरोधात कोणतीही ठोस कारवाई प्रशासनाकडून होताना दिसत नाही. दिवसेंदिवस वाळूमाफियांची संख्या वाढत चालली आहे. काही रत्नागिरीतील मंडळींनीही संगमेश्वरात जाऊन वाळूउपसा सुरु केला आहे.
भरारी पथके करतात काय?
प्रशासनाची भरारी पथके कुठे भरारी घेतात? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. भरारी पथकाकडून किंवा खनिकर्म विभागाकडूनही वाळूमाफियांवर कारवाई होत नाही. जेव्हा कधी ही पथके वाळू उत्खननाच्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांना कोणीही सापडत नाही. हे ही न सुटणारे कोडे आहे. वाळू उत्खननामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे.
Comments are closed.