। रघुनायका आपलेसे करावे।
>> संध्या शहापुरे
समर्थ रामदास स्वामी चंचल मनाला म्हणतात, तू रघुनायकाच्या- श्रीरामाच्या भक्तीत रत होऊन राहा. “भक्तांचा कैवारी, दीनांचा नाथ’’ हाच नाद ज्याच्या ब्रिद रूपी तोडरांतून अखंड येतो आहे त्या श्रीरामाच्या स्मरणात -चिंतनातच राहून त्याला आपले करून घे. कारण तोच तुला सन्मार्ग दाखवणार आहे. रामचरित मानसात संत तुलसीदास म्हणतात, ‘रामचरित चिंतामणी चारू, संत सुमती तिय सुभग सिंगारू, जग मंगल गुनग्राम राम के, दानि मुकुति धन धरम धामके’ श्री रामचंद्राचे चरित्र सुंदर चिंतामणी आहे. संतांच्या बुद्धीचा सुंदर शृंगार आहे. श्रीरामाचे गुण जगत कल्याण करणारे आहेत. एवढेच नव्हे तर रामरायाचे गुण मुक्ती, धन, धर्म आणि परमधाम प्राप्त करून देणारे आहेत. भक्ताच्या मनातील काम, क्रोध आणि कली युगात निर्माण झालेल्या हत्तीसारख्या बलाढय़ अशा अवगुणांचा नाश करण्याचे सामर्थ्य असलेल्या वनराज सिंहाप्रमाणे श्रीरामाचे चरित्र शक्तिशाली आहे. तुलसीदास श्रीरामांच्या गुणांचे वर्णन करताना म्हणतात, ‘कुपथ कुतरक कुचालि, कलि कपट दंभ पाषंड, दहन राम गुन ग्राम जिमि, इंधन अनल प्रचंड… श्रीरामचंद्राच्या गुणांचा अग्नी कुकर्म, कुमार्ग, कुतर्क, कपट, दंभ आणि पाखंडाला जाळून टाकतो. रामरायाचे असे रूप, स्मरणात सदैव असणे म्हणजेच ‘राघवापाशी वस्ती’ करण्यासारखे आहे.
Comments are closed.