संगमेश्वरमध्ये विहिरीत पडलेल्या पाच रानगव्यांना जीवदान; वन विभागाचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथे एका कोरड्या विहिरीत पडलेल्या पाच रानगव्यांना सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले आहे. बुधवारी 11 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, वन कर्मचाऱ्यांनी तातडीने राबवलेल्या बचाव कार्यामुळे या रानगव्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

लोवले येथील संतोष प्रदीप खेडेकर यांच्या मालकीच्या कोरड्या विहिरीत हे रानगवे पडल्याचे समोर आले होते. कृषी सहाय्यक समीर दोरखडे यांनी या घटनेची माहिती तत्काळ वन विभागाला दिली. माहिती मिळताच संगमेश्वर-देवरुखचे परिमंडळ वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आवश्यक साहित्यासह घटनास्थळी धाव घेतली. ही विहीर सुमारे 15 ते 20 फूट खोल आणि 15 फूट व्यासाची होती. बॅटरीच्या उजेडात पाहणी केली असता, त्यात दोन पूर्ण वाढ झालेले रानगवे आणि तीन पिल्ले अडकल्याचे दिसून आले. विहिरीची खोली जास्त असल्याने या रानगव्यांना बाहेर पडणे कठीण झाले होते.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने जेसीबीच्या सहाय्याने विहिरीच्या एका बाजूने माती खोदून रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. या मार्गावरून रात्री दीड वाजेच्या सुमारास पाचही रानगवे विहिरीबाहेर सुरक्षितरीत्या पडले. यामध्ये एक मोठा नर, एक मादी आणि त्यांच्या तीन पिल्लांचा समावेश होता. विशेष म्हणजे या मोहिमेत कोणत्याही रानगव्याला दुखापत झाली नाही आणि बाहेर पडताच त्यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली.

हे रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत वनपाल सागर गोसावी, वनरक्षक आकाश कडुकर, सुरज तेली आणि सहयोग कराडे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. या संकटसमयी स्थानिक ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून वन विभागाला मोलाचे सहकार्य केले.

Comments are closed.