संगमेश्वर महामार्ग नव्हे मृत्यूचा मार्ग…! ठेकेदार आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अपघातांची मालिका सुरुच

संगमेश्वरपासून काही अंतरावर असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओझरखोल येथे वळणाजवळ मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघाताचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एसटी बस आणि मिनी बसमध्ये भीषण अपघात झाला होता. या घटनेनंतर जाग आलेल्या ठेकेदाराने तातडीने डायवर्जन रस्ता तयार केला. मात्र तो निकृष्ट दर्जाचा असल्याचे उघड होत असल्याने अपघातांची मालिका सुरुच आहे.

काही दिवसांपूर्वी याच मार्गांवर अपघातात मिनी बस चालक किरण रहाटे कॅबिनमध्ये अडकून पडले होते. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तब्बल तासभर प्रयत्न करून त्यांना बाहेर काढले. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले होते. घटनास्थळी वळण मार्ग व दिशादर्शक फलक नसल्यामुळे एसटी बस चुकीच्या दिशेने गेली आणि अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. त्यानंतर ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संतप्त जमावाने रोष व्यक्त करत ठेकेदाराच्या नावाने जोरदार संताप व्यक्त केला.

अपघात घडल्यानंतर ठेकेदाराने काही प्रमाणात सुधारणा केली. अपघात स्थळा जवळील नादुरुस्त वळण दुरुस्त करून दिशादर्शक फलक लावण्यात आले. मात्र, ही सुधारणा केवळ वरवरची असल्याचे दोन दिवसांतच उघड झाले. वळण रस्त्यावर टाकलेली खडी पावसामुळे वाहून गेली असून, रस्त्यावर मोठा खड्डा पडून त्यात पाणी साचले आहे. परिणामी, वाहनचालक गोंधळून अपघात होत आहेत.

एसटी आणि मिनी बस अपघाताच्या अवघ्या चौथ्या दिवशी, त्याच भागात स्विफ्ट कार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. रस्त्याची स्थिती पाहून नेमका रस्ता आहे की पाण्याचे तळे, असा संभ्रम निर्माण होत आहे. अशा संभ्रमात सापडलेल्या स्विफ्ट चालकाने चुकीच्या दिशेने गाडी नेल्यामुळे अपघात झाला, असे बोलले जात आहे.

तळेकांटे ते आरवली दरम्यान सुरु असलेल्या महामार्गाच्या कामांबाबत सातत्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ठेकेदाराच्या मनमानी आणि कामातील निकृष्टपणा याबाबत नागरिक ओरड करत असूनही संबंधित प्रशासन डोळेझाक करत आहे. यामुळे फक्त ठेकेदारालाच नव्हे, तर त्याच्या पाठिशी उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरावे, अशी मागणी होत आहे.

Comments are closed.