Sangameshwar News – गॅस गैरव्यवहारावर रोखण्यासाठी संगमेश्वर तालुक्यात पुरवठा विभागाची करडी नजर, हॉटेल आणि एजन्सींची कसून तपासणी
संगमेश्वर तालुक्यात घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी आणि गॅस वितरण प्रणालीतील संभाव्य अफरातफर रोखण्यासाठी महसूल आणि पुरवठा विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. तहसीलदार अमृता साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध गॅस एजन्सी आणि हॉटेल व्यवसायांची कसून तपासणी केली जात आहे. प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अनधिकृतपणे गॅस वापरणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील गॅस वितरणात पारदर्शकता राहावी आणि ग्राहकांची फसवणूक टाळता यावी, यासाठी नायब तहसीलदार महेंद्र कांबळे व त्यांच्या पथकाने प्रत्यक्ष मैदानात उतरून तपासणी सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान गॅस एजन्सींमधील साठा रजिस्टर, वितरणाची पद्धत आणि हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाची तपासणी केली जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंतच्या तपासणीत तालुक्यात कुठेही मोठी अफरातफर आढळून आलेली नाही. मात्र, प्रशासनाने आपली देखरेख कायम ठेवली आहे.
संगमेश्वर तालुक्यात एकूण 5 गॅस एजन्सी कार्यरत आहेत, परंतु त्यांच्या ग्राहक संख्येमध्ये मोठी तफावत दिसून येते. तालुक्यात एकूण 46 हजार 429 घरगुती ग्राहक असून 312 व्यावसायिक गॅस जोडण्या आहेत. एकूण 5 एजन्सींपैकी केवळ दोनच एजन्सींकडे 34 हजार 418 ग्राहकांचा मोठा भार आहे, तर उर्वरित तीन एजन्सींकडे केवळ 12 हजार 11 ग्राहक आहेत. वितरणातील हा असमतोल दूर करण्याचे मोठे आव्हान सध्या प्रशासनासमोर आहे.
तपासणी दरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली आहे की, अनेक हॉटेल्समध्ये अद्यापही पारंपरिक चुलींचा वापर केला जात आहे. तसेच काही ठिकाणी डिझेल स्टोव्हचा वापर करून व्यवसाय चालवला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वाढते दर आणि त्यांची उपलब्धता यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी या पर्यायांकडे आपला कल वळवला असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.
Comments are closed.