संगमेश्वर तालुक्यात बिबट्याची दहशत, शेवरवाडीतील कुक्कुटपालक यांचे मोठे आर्थिक नुकसान
संगमेश्वर तालुक्यातील शेवरवाडी, करंबेळे परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याकडून वारंवार कुक्कुटपालनावर हल्ले होत असून, या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोंबड्या, जिमी फाऊल आणि टर्की ठार झाल्याने कुक्कुटपालक विद्या विनायक नाचरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
विद्या नाचरे यांच्या माहितीनुसार, त्यांच्या कुक्कुटपालनातील 160 गावठी कोंबड्या, 12 जिमी फाऊल आणि 2 टर्की, असे एकूण 174 पक्षी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. याशिवाय, गेल्या काही काळात बिबट्याने त्यांच्या 200 ते 250 गावठी कोंबड्या मारल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे कुक्कुटपालनावर अवलंबून असलेल्या नाचरे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्या उदरनिर्वाहावरही गंभीर परिणाम झाला आहे. बिबट्याचा सातत्याने होणारा वावर आणि रात्रीच्या वेळी होणारे हल्ले यामुळे शेवरवाडी व करंबेले परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घरांच्या आसपास तसेच कुक्कुटपालनाच्या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
या प्रकाराची वन विभागाने तातडीने दखल घेऊन परिसराची पाहणी करावी, बिबट्याचा माग काढण्यासाठी कॅमेरा ट्रॅप बसवावेत आणि आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. “बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे विद्या विनायक नाचरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वन विभागाने या गंभीर घटनेकडे गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी. नुकसानग्रस्त कुक्कुट पालकाला शासनाच्या नियमानुसार योग्य ती नुकसानभरपाई मिळवून द्यावी,” अशी मागणी नाचरे कुटुंबियांनी वनविभाग आणि पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर भविष्यात मानवी जीविताला धोका निर्माण होऊन एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने “झोपेतून जागे होऊन” तातडीने आवश्यक कार्यवाही करावी.
सचिन रामचंद्र गेल्ये
Comments are closed.