संघाशी संबंधित संस्था सरकारच्या निर्णयाला विरोध करते
निर्णय मागे घेण्याची केली मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित भारतीय किसान संघाने कापसाच्या आयातशुल्कावरील सूट 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्याच्या निर्णयावर आक्षेप दर्शविला आहे. या निर्णयामुळे देशांतर्ग शेतकऱ्यांचे नुकसान होईल आणि दीर्घकाळात भारताची आयातीवरील निर्भरता वाढणार असल्याचे या संघटनेचे सांगणे आहे. भारतीय किसान संघाने यासंबंधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले आहे. 320 लाख बेल्स कापसाचे उत्पादन दरवर्षी भारतात होते, तर देशांतर्गत मागणी 392 लाख बेल्सची असल्याचे संघटनेने पत्रात नमूद केले. एका बेल्समध्ये 170 किलो कापूस असतो. आम्ही आयातीवर सूट देत राहिलो, तर भारत कापसाचा निर्यातदार होण्याऐवजी काही वर्षांमध्ये मोठा आयातदार ठरेल. कापसाच्या बियाण्यांची उपलब्धता न वाढल्यास भारत आयातदार देश ठरेल असे संघटनेने म्हटले आहे.
कापसाच्या किमती 7000 रुपये प्रति क्विंटलवरून कमी होत 6 हजार रुपयांवर आल्या आहेत. 2000 रुपये प्रति क्विंटल दराने बाहेरून कापूस उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांकडून कुणी 5000 रुपये प्रति क्विंटल दराने कापूस का खरेदी करेल असे प्रश्नार्थक विधान भारतीय किसान संघाने केले आहे.
Comments are closed.