सांगली शहरातील पूर नियंत्रणच्या 611 कोटींच्या कामांची निविदा पुढील आठवड्यात

सांगली शहरात येणाऱ्या महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने राबविण्यात येणाऱ्या पूर नियंत्रण कार्यक्रम प्रकल्पातून मंजूर झालेल्या 611 कोटींच्या कामांची निविदा पुढच्या आठवडय़ात निघणार आहे. या कामावर व्यवस्थापन करण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या एजन्सीसाठी 4 कोटींची निविदा उघडण्यात आली आहे. त्यामुळे महापुराची दाहकता कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाची कार्यवाही आता सुरू होणार आहे.

सन 2019 आणि 2021च्या महापुराची स्थिती पुन्हा उद्भवू नये, या पार्श्वभूमीवर सांगली, कोल्हापूरमध्ये महापूर परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून 3 हजार 200 कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जुलै 2024 मध्ये जागतिक बँकेचे पथक सांगलीत आले होते. त्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली. सविस्तर माहितीही घेतली. श्यामरावनगर तसेच महापालिका क्षेत्रातील अन्य 78 ठिकाणी साचणारे पावसाचे व पुराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठीची कामे प्रस्तावित करण्यात आली. यासाठी महापालिकेने सुमारे 611 कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. यामध्ये शेरीनाल्यातून पाणी जलदगतीने विनाअडथळा पुढे जाण्यासाठी पाईपच्या मोरींऐवजी 23 ठिकाणी बॉक्स मोरींचे बांधकाम करणे, विजयनगर चौक जिल्हा न्यायालयाच्या पूर्वेकडील नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण, काँक्रीटीकरण करणे. याबरोबर श्यामरावनगर तसेच कालिकानगर, गंगोत्रीनगरसह परिसरात पूर व पावसाच्या साचून राहणाऱ्या पाण्याचा जलदगतीने निचरा व्हावा, यासाठी मोठय़ा गटारी, अंतर्गत लहान गटारींचे बांधकाम व अन्य उपाययोजना करणे, शंभरफुटी रस्त्याच्या उत्तर बाजूला भोबे गटार आहे, आता दक्षिण बाजूला धामणी चौक ते कोल्हापूर रोड व मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत मोठी गटार बांधण्याचे काम प्रस्तावित आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर पावसाचे पाणी साचू नये, यासाठी गटार बांधकाम करणे, तसेच मिरजेतील ओढे, नाले बांधीव करणे, त्यावर छोटे पूल बांधणे आदी कामांचा समावेश पूरनियंत्रण व पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तयार केलेल्या आराखडय़ात आहे.

सुमारे 616 किलोमीटरचे मोठे नाले, भोबे गटारी व इतर जोडणाऱ्या नाले-गटारींचे खोलीकरण, रुंदीकरण व काँक्रीटीकरण, अंकली नाल्याचे महापालिका क्षेत्रातील हद्दीत खोलीकरण, रुंदीकरण व काँक्रीटीकरण व पुढे ग्रामीण भागातून जाणाऱ्या नाल्यातील गाळ काढणे व त्यातून पाणी नदीपर्यंत जाण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. श्यामरावनगरसह सुमारे 78 ठिकाणी पावसाचे पाणी साचते. मात्र, आता हा प्रश्नदेखील निकालात निघणार आहे. शहरातील नैसर्गिक नाल्याच्या दोन्ही बाजूस सुमारे 60 हजार वृक्षारोपण करण्यात येणार आहे. नुकतीच या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. शासनाने एजन्सी नियुक्ती करण्याबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार केला होता.

त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. चार कोटींची ही निविदा प्रक्रिया आहे. या कंपनीमार्फत या कामांवर देखरेख केली जाणार आहे. त्यासाठी ही कंपनी काम करणार असून, याचे नियंत्रण मनपाकडे असणार आहे. त्यासाठी निविदा उघडण्यात आली आहे. सात निविदा दाखल झाल्या आहेत. दोन दिवसांत कंपनीची निश्चिती होणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून व्यवस्थापन केले जाणार आहे. यामध्ये पर्यवेक्षण, कामाची गुणवत्ता तपासणी, पारदर्शकता यावर नियंत्रण कंपनी ठेवणार आहे. महापालिकेकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांची क्षमता नसल्याने ही कंपनी शासनाकडून नियुक्त होणार आहे. याची कार्यवाही पूर्ण होत आहे. त्यामुळे आता 611 कोटींच्या निविदेचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात ही निविदा प्रक्रिया खुली करण्यासाठी महापालिकेकडून पावले उचलली जात आहेत.

616 कि.मि. नाले, गटारी आरसीसी; 60 हजार झाडे लावणार

n महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी व 78 ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी मनपा क्षेत्रातील सुमारे 616 किलोमीटरचे नैसर्गिक नाले, गटारी आरसीसी बांधण्यात येणार आहेत. तर नाल्याशेजारी सुमारे 60 हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 611 कोटींचा स्ट्रॉर्म वॉटर ड्रेनेजचा (पावसाळी पाणी निचरा) मास्टर प्लॅन आहे. यामध्ये शेरीनाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण व काँक्रीटीकरण, नाल्यातील गाळ काढणे व त्यातून पाणी नदीपर्यंत जाण्यासाठी उपाययोजनांचा समावेश यामध्ये आहे.

Comments are closed.