जुन्या वादातून माथाडी कामगार नेत्याच्या नाताला संपवलं, 4 दिवसापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

सांगली क्राईम न्यूज : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील धक्कादायक घटना घडली आहे. आरग येथील रेल्वेच्या मालधक्केतील ठेकेदारी आणि 10 लाखाच्या खंडणीच्या वादातून हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर या 14 वर्षीय मुलाच्या डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली होती. निलेश गडदे नामक सराईत गुन्हेगाराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याचे आता तपासात समोर आले आहे. या प्रकरणी गेल्या चार दिवसापासून पसार झालेला कुख्यात गुंड निलेश गडदेला अखेर जेरबंद केलं आहे.

सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कर्नाटक सीमेवर कारवाई केली आहे. इतर तीन साथीदार अद्यापही पसारच आहेत. निलेश दडगे यांने गुरुवारी रात्री 14 वर्षाच्या वेदांत बंडगर याचा डोळ्यात गोळी झाडून खून केला होता. मालधक्क्यातील ठेकेदार बाळू बंडगर आणि त्याचा साथीदार लक्ष्मण खरातकडे संशयित हल्लेखोर निलेश गडदेने आरग येथील रेल्वेची मालधक्क्यावरील ठेका द्यावा किंवा 10 लाख रुपये खंडणी द्यावी, अशी लक्ष्मण खरात याचा घरात घुसून मागणी केली होती. याबाबतची तक्रार देण्यासाठी बाळू बंडगर त्यांचा मुलगा मारुती बंडगर आणि लक्ष्मण खरात हे तिघेही जत पोलीस ठाण्यात गेले होते. याचा राग मनात धरून निलेश गडदे व त्याच्या साथीदारांनी बाळू बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर याच्या डोक्यामध्ये गोळी झाडून त्याचा निर्घृणपणे खून केल्याची माहिती मिळाली आहे.

माथाडी कामगारांमधील जुन्या वादातून घटना घडली?

प्राथमिक तपासात माथाडी कामगारांमधील जुन्या वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. अल्पवयीन मुलाची घरात घुसून हत्या झाल्याने सांगली शहरात खळबळ उडाली असून या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान ज्या मालधक्क्याच्या वादातून सुरुवात झाली, त्या लक्ष्मण खरात यांच्या घरात घुसून सराईत गुन्हेगार निलेश गडदे याने धमकी दिली होती. आरग येथील मालधक्क्यावरील ठेका सोडावा, अन्यथा 10 लाख रुपयांची खंडणी द्यावी, अशी मागणी त्याने केली होती. तसेच पैसे न दिल्यास मारून टाकण्याची धमकीही पत्नी आणि मुलांसमोर दिल्याची तक्रार लक्ष्मण खरात यांनी पोलिसात केली आहे.

मंगळवारी मोर्चा

सांगली हमाल पंचायतनेही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्याच्या वादातून लहान मुलावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय असल्याचे सांगून आज सांगलीतील सर्व मालधक्क्यावरील हमालांनी काम बंद आंदोलन केले. तसेच मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे हमाल पंचायतचे नेते विकास मगदूम यांनी सांगितले.

Comments are closed.