अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतुकीविरोधात मोहीम, सांगलीत 41 गुन्हे दाखल; 29 आरोपींना अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सांगली जिह्यात हाती घेण्यात आलेल्या अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहिमेंतर्गत जिह्यात एकूण 41 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 29 आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.

पुणे जिह्यात झालेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सांगली कार्यालयामार्फत जिह्यात 29 ते 31 मे या कालावधीत अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सर्व निरीक्षक क्षेत्रांतर्गत एकूण 41 गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण 29 आरोपींना अटक करण्यात आली.

या कारवाईदरम्यान एक वाहन आणि इतर मुद्देमालासह एकूण 5 लाख 71 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये देशी मद्य 57.32 बल्क लिटर, हातभट्टी मद्य 1015 बल्क लिटर, विदेशी मद्य 3.72 बल्क लिटर, ताडी 250 बल्क लिटर इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर रसायन 10120 बल्क लीटर जागीच नाश करण्यात आले.

Comments are closed.