परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून वडिलांनी केली मारहाण, मुलीचा मृत्यू; सांगलीतली धक्कादायक घटना

परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून वडिलांनी आपल्या मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला आहे. सांगलीतल्या आटपाडीत ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार धोंडीराम भोसले हे सांगलीत एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. तर त्यांची मुलगी साधना बारावीला होती. साधनाला मोठं होऊन डॉक्टर व्हायचं होतं म्हणून तिने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. बारावीच्या परीक्षेसाठी साधनाने खासगी क्लास लावला होता. या क्लासमध्ये चाचणी परीक्षा झाली होती. या परीक्षेत साधनाला कमी गुण मिळाले. म्हणून साधनाचे वडिल धोंडीराम भोसले नाराज झाले होते आणि त्यांनी साधनावर हात उचलला. तेव्हा साधनाने रागाच्या भरात वडिलांना उलट उत्तर दिलं. पप्पा तुम्हालाही कमी गुण मिळाले होते. एवढा अभ्यास करून तु्म्ही काय कलेक्टर झालात का असा सवाल साधनाने वडिलांना विचारला. या उलट
उत्तरामुळे भोसले यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यामुळे भोसले यांनी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला बेदम मारहाण केली.

दुसऱ्या दिवशी योगा दिन होता, त्यामुळे भोसले लवकर शाळेत गेले. पण सकाळ होऊनही साधना उठली नव्हती. आवाज देऊनही साधना उठत नव्हती म्हणून तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी तपासात तिला मृत घोषित केले.

अंगावरील जखमांमुळे कळाले कारण
साधना बाथरुममध्ये पडली असे कारण आधी तिच्या पालकांनी सांगितले. पण तिच्या शरीरावर जखमा होत्या. त्यामुळे साधनाला बेदम मारहाण झाल्याचे लक्षात आले आणि यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे निष्पण्ण झाले.

Comments are closed.