अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना

सांगली : नात्यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या रागातून मामाने आणि त्याच्या मुलाने भाच्याची डोक्यात दगड घालून हत्या केली. राहूल आप्पासाहेब सुर्यवंशी असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी संदीप रावसाहेब सावंत (वय 52), सौरभ संदीप सावंत (वय 22) या दोघांना कुपवाड पोलिसांनी अटक केली आहे.

मयत राहूल सूर्यवंशी हा मूळचा कर्नाटक राज्यातील येडूर मांजरीचा आहे. त्याची आई आणि भाऊ हे दोघे गावी राहतात. गेल्या काही महिन्यापूर्वी राहूल सूर्यवंशी हा कामानिमित्त कुपवाड येथे आला होता. तो कुपवाड औद्योगिक वसाहत मधील एका कंपनीत काम करीत होता.

अल्पवयीन मुलीची सातत्याने छेड काढत होता

राहूल सूर्यवंशी हा गेल्या आठ ते दहा दिवसापासून नात्यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढत होता. पीडित मुलीने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यावर नातेवाईकांनी राहुलला वेळोवेळी समज दिली होती. तरीही तो ऐकत नव्हता.

राग अनावर झाल्याने हत्या

मंगळवारी दुपारी राहूल सूर्यवंशी हा घरात एकटाच होता. त्यावेळी त्याने पीडित मुलीची पुन्हा छेड काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार नातेवाईक असलेला सौरभ सावंत आणि राहुलचा मामा संदीप सावंत याच्या निदर्शनास आला. त्यानंतर सौरभ सावंत याचा राग अनावर झाला. सौरभ याने रागाच्या भरात राहुल सूर्यवंशी याला पकडून मारहाण केली. तर संशयित संदीप सावंत याने लोखंडी रॉडने हल्ला केला.

संशयित सौरभ याने शेजारी पडलेला दगड हातात घेऊन राहुल सूर्यवंशीच्या डोक्यात घातला. डोक्यात वर्मी घाव बसल्याने राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडला. राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच संशयित फरार झाले. राहुल सूर्यवंशीचा यामध्ये मृत्यू झाला. या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी संदीप सावंत आणि सौरभ सावंत यांना अटक केली आहे.

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..

Comments are closed.