सांगलीत पंचायत समिती सभापती निवडीत भाजपाला धक्का! काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसची सरशी
सांगली जिह्यात पंचायत समिती सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. दहापैकी पलूस, कडेगाव, मिरज पंचायत समितीमध्ये काँग्रेसने झेंडा फडकावला. मिरजेत भाजपा बहुमताजवळ असताना काँग्रेसने धक्का देत सभापतीपद खेचून आणले. वाळवा आणि कवठेमहांकाळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाने, तर खानापूर, आटपाडीत शिंदे गट, शिराळा व तासगावमध्ये अजित पवार गटाने सभापतीपद काबीज केले. जिह्यात जत पंचायत समितीमध्ये भाजपाचा एकमेव सभापती झाला.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या फेब्रुवारीत लागलेल्या निकालातून नऊ पंचायत समितीमधील सत्तेचे समीकरण स्पष्ट झाले होते. मिरजेत भाजपा सत्तेच्या उंबरठय़ावर होते. येथे काँग्रेसने पद्धतशीर खेळी करत भाजपाला धक्का दिला. मिरजेचे आमदार सुरेश खाडे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा अति आत्मविश्वास नडला. शिंदे गटाचा एक सदस्य रात्रीपासून अचानक गायब झाला. त्यामुळे शिंदे गटाने काँग्रेसला पाठिंबा देत भाजपाला शह दिला. काँग्रेसच्या तन्वी कमलेकर या 21 वर्षांच्या तरुणीला सभापतीपदाची संधी मिळाली. शिंदे गटाच्या ललिता शेजूळ उपसभापती झाल्या.
कवठेमहांकाळ पंचायत समितीत 5 जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर 3 जागा अजित पवार गटाला मिळाल्या आहेत. पंचायत समितीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा झेंडा फडकला. सभापतीपदी सिंधुताई पाटील तर उपसभापतीपदी वामन कदम यांची निवड झाली. तासगाव पंचायत समितीत अजित पवार गटाच्या अरुणा पाटील सभापती आणि सुखदेव पाटील यांची उपसभापतीपदी निवड झाली. वाळवा पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उदयसिंह प्रतापराव पाटील, तर प्रकाश पाटील यांची उपसभापतीपदी निवड झाली.
जत तालुक्यातील पंचायत समितीच्या 18 पैकी 12 जागा भाजपला मिळाल्या होत्या. अजित पवार गटाला 2, तर काँग्रेसला 4 जागांवर यश मिळाले होते. केवळ एकमेव जत पंचायत समितीची सत्ता भाजपाला मिळाली. सभापतीपदी अर्चना पाटील, तर उपसभापतीपदी रविकुमार बगली यांची निवड झाली.
कडेगाव पंचायत समितीत काँग्रेसचे डॉ. जितेश कदम यांची सभापतीपदी, तर डॉ. विजय महाडिक यांची उपसभापतीपदी निवड झाली. पलूस पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. काँग्रेसचे जगन्नाथ मोटे यांची सभापतीपदी, तर वैभव उगळे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. खानापूर आणि आटपाडी पंचायत समिती शिंदे गटाच्या ताब्यात गेली आहे.
Comments are closed.