महापालिका निवडणूकीसाठी सांगलीत मतदार यादी अंतिम करण्याचे काम वेगाने सुरू!

सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सांगली, मिरज, कुपवाड विभागांची मतदार यादी अंतिम करण्याचे काम महापालिका प्रशासनाने वेगाने सुरू केले आहे. आज सुट्टी दिवशी नूडल अधिकारी (निवडणूक) तथा उपायुक्त स्मृती पाटील यांनी मिरज, कुपवाडमधील अधिकारी, कर्मचाऱयांची बैठक घेतली. प्रभाग समिती तीन व चारमधील प्रभागाचे नकाशे व चतुःसीमा निश्चित करण्यात आल्या. प्रत्यक्ष जागेवर जाऊन यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
सांगली महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाच्या आदेशाने पालिका प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना तयार केली. त्यावर हरकती, सूचना मागविण्यात आल्या. 229 हरकतींवर सुनावणी झाली. 162 हरकती मान्य करण्यात आल्या. तर उर्वरित फेटाळण्यात आल्या. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली. सांगली, मिरज व कुपवाड शहरात 20 प्रभाग आहेत. यातील दोन प्रभाग तीन सदस्यांचे, तर 18 प्रभाग चार सदस्यांचे आहेत. सर्व प्रभागांत मिळून 78 सदस्य संख्या आहे.
अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यावर राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. एक जुलैला अस्तित्वात असलेली मतदारयादी महापालिका निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रात सांगली व मिरज हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. या दोन्ही विधानसभा मतदारसंघाची यादी फोडून महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी सहा नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. त्यावर 14 नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. या हरकती सूचनावर निर्णय घेऊन अंतिम मतदार यादी 28 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. 4 डिसेंबर रोजी मतदान केंद्राची यादी जाहीर होणार असून, 10 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर महापालिका प्रशासन पालिका निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. उपायुक्त स्मृती पाटील यांची यासाठी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Comments are closed.