क्रिकेटनामा – विंडीजने रणशिंग फुंकलंय?

>>
काल शुभमन आणि गौतमने एकूण मामला अंमळ हलक्यातच घेतला. गंभीरपणे घेतला नाही असंही म्हणायला जागा आहे! विंडीजला फॉलोऑन देण्याऐवजी आपण फलंदाजीचा सराव करून घेतला असता तर बरं झालं असतं. उपाहारानंतर खेळपट्टी सुस्तावली, अधिक संथ झाली होती. एकशे पस्तीसच्या वेगाने सुटलेले चेंडूसुद्धा जुरेल त्याच्या बुटाजवळ आणि अधूनमधून उसळी घेणारा चेंडू फार तर कंबरेजवळ गोळा करत होता. गोलंदाजाला उत्साह देण्याचा, प्रोत्साहन देण्याचा खेळपट्टीचा मूड नव्हता. एखादा कुलदीप सोडला तर फारसे दिवे लावण्याऐवढी ज्योत कुणाला पेटवता येत नव्हती. त्याने पहिल्या डावात मात्र कमाल केली.
इमलाक, ग्रीव्हज आणि सिल्सला चतुराईने पायचीत केल्यावर शे होपला ज्या चेंडूवर बाद केलं तो चेंडू केवळ अप्रतिम होता. दिशा, टप्पा, उंची, वेग सारं कसं चोख. काजू, बदाम, किशमिश, केळं घातलेल्या चवदार प्रसादासारखं! आणि दुसऱ्या डावात एथनेझला बाद करणारा वॉशिंग्टनचा ऑफ स्पिन सत्यनारायणाच्या आशीर्वादासारखा! उपाहारानंतर मात्र चेंडूने सरळ, धोपट मार्ग राखला.
असो, मुद्दा असा की निर्जीव खेळपट्टीवर फॉलोऑन देऊन हिंदुस्थानने विंडीजला कमी लेखलं. कॅम्पबेल 87 अन् होप 66 धावांवर नाबाद आहेत आणि विंडीजची धावसंख्या एकशे सत्तरपार गेलीय. दोघांनीही लढाई करण्याची तयारी दाखवली आहे. थोडक्यात विंडीजने प्रथमच आपल्या अरेला कारे केलंय. त्यांच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला विश्रांतीवीर बुमराने नव्या चेंडूने गोलंदाजी का केली नाही की गिलने त्याला गोलंदाजी दिली नाही?
क्रिकेटचा खेळ जरतरचा किंवा अनंत अनिश्चिततांचा मानला जातो. त्यामुळेच फॉलोऑन मिळाल्यानंतर ईडन गार्डनला आपल्या बॅटने ऑस्ट्रेलियावर बाजी उलटवणारे लक्ष्मण-द्रविड आठवतायत. हरभजनच्या भिंगरीची आठवण येतेय! कॅम्पबेल आणि होप ठरतील का विंडीजचे लक्ष्मण-द्रविड? अन् वॉरिकन किंवा चेस करतील का भज्जीसारखा चमत्कार? की विनाकारण करतोय मी चित्कार…
आता आज सिराज-बुमरा सकाळच्या वातावरणातील जडपणाचा किती उपयोग करून घेतात हेच पाहायचं. खेळपट्टी किती वेळ रुसून बसते ते पाहायचं. कुलदीप, सुंदर आणि जडेजा खेळपट्टीला कसे राजी करतात ते पाहायचं. आणि हो, ज्या संघाला तिसऱ्याच दिवशी घरी पाठवण्याच्या गप्पा मारणारे आपण त्यांना पुरून उरतो की विजयाच्या घशातून…
Comments are closed.