क्रिकेटवारी – मालिकेत बरोबरीची संधी! गड म्या वाचविला, हारीचा डाव जिंकीला, नाही तो अखेरचा, ध्यास मजला सम-समानतेचा…
>> संजय खडे
आज सर्व हिंदुस्थानी क्रिकेट चाहत्यांचं मन अशीच रचना गात असेल. आशादायी, उमेद वाढवणारी, नवी उभारी देणारी. पराभवाचा राक्षस समोर विकट हास्य करत असताना अनिर्णिताचा निकाल विजयासारखाच भासतो! राहुल, कप्तान गिल, जाडेजा आणि वॉशिंग्टन या यशाचं श्रेय हक्काने घेऊ शकतात.
खरं तर राहुल आणि गिल यांच्याकडूनच मोठय़ा अपेक्षा होत्या. पण राहुल लवकर बाद झाला. तो बाद होण्यासाठी फक्त बेन स्टोक्सने हातात चेंडू घेणं आवश्यक होतं! त्याने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली. गिलसुद्धा आपलं शतक करून बाद झाला. पण का कुणास ठाऊक, तेव्हाही मनाने लावलेला सूर नकारात्मक नव्हता…
याच सकारात्मक तारा किणकिणल्या. जाडेजा-सुंदरचा ताल जुळला. दोघांची शतकी फलंदाजी बाजीप्रभूंच्या लढाईएवढी महत्त्वाची होती. दोघांच्याही शतकी खेळी हट्टी होत्या. स्टोक्सने सामना अनिर्णित म्हणून मान्य केला खरा, पण आमच्या लढवय्यांनी तो अमान्य केला! असो. त्यांच्यामुळेच हिंदुस्थानला या मालिकेत 2-2 अशा बरोबरीची, सम-समानतेची संधी कायम राखता आली आहे.
रोमहर्षक, चित्तथरारक असे अनेक अनिर्णित सामने मी जुन्या काळात पाहिलेले आहेत. सुनील गावसकर, चेतन चौहान, अंशुमन गायकवाड, मोहिंदर अमरनाथ, गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर असे खंदे वीर त्या वेळचे शिलेदार होते. आधुनिक काळात मात्र असे विस्मयकारक, अद्भुत अनिर्णित सामने क्वचितच पाहायला मिळतात!
जाडेजा आणि वॉशिंग्टन यांनी संयम, जिद्द आणि जिगरबाज वृत्ती दाखवली. त्यांच्यामुळेच आज आपल्या आशा जिवंत आहेत. मालिकेच्या शेवटच्या सामन्यात आता आपण विजय मिळवून बरोबरी साधण्याची इच्छा अन् अपेक्षा आहे!
Comments are closed.