रोहितच्या कसोटीतील खराब कामगिरीवर 'या' माजी क्रिकेटपटूचा टोला! म्हणाला, “त्याची निवृत्ती…”
बुधवारी (7 मे) भारताचा दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्माने (Rohit Sharma) अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आयपीएल 2025च्या मध्यात रोहितने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करून त्याच्या निवृत्तीची माहिती दिली. रोहितच्या निर्णयावर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जण त्याच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर काहींना वाटते की त्याने घाई केली. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहितची खराब आकडेवारी शेअर करताना त्याने निवृत्तीचा निर्णय योग्य ठरवला आहे.
रोहित शर्माने 2013 मध्ये कसोटी पदार्पण केले आणि त्याच्या 11 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने बरेच चढ-उतार पाहिले. सुरुवातीच्या काळात त्याला फारसे यश मिळाले नाही परंतु 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला सुरुवात केल्यापासून त्याने मागे वळून पाहिले नाही. रोहितने भारतासाठी 67 कसोटी खेळल्या आणि 40.57च्या सरासरीने 4,301 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 12 शतकांसह 18 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय, विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर त्याने 24 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि 12 सामन्यांमध्ये विजय मिळवला.
रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीवर प्रतिक्रिया देताना संजय मांजरेकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, “त्याच्या शेवटच्या 15 डावांमध्ये 164 धावा केल्या. त्यापैकी 10 डाव बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर होते. सरासरी 10.9. त्याच्या सध्याच्या फिटनेस पातळीसह… रोहित शर्माचे कसोटी सलामीवीर म्हणून दिवस संपले आहेत. तर…”
रोहितने 2024चा टी20 विश्वचषक जिंकल्यानंतरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात लहान स्वरूपाचा निरोप घेतला होता. त्याच वेळी, तो आता कसोटीतूनही निवृत्त झाला आहे. आता रोहित फक्त वनडे सामन्यांमध्येच खेळत राहील. त्याचे मुख्य लक्ष्य 2027चा वनडे विश्वचषक असेल.
Comments are closed.