प्रश्न, शंका आणि रहस्य… निवडणूक आयोगासमोर उलगडा करावा लागणार; राज ठाकरे येणार; संजय राऊत यांनी दिली माहिती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. निवडणूक आयोगाला भेटणे औपचारिकता आहे. काही प्रश्न, शंका आणि रहस्य असून त्याचा उलगडा निवडणूक आयोगासमोर करावा लागेल, असेही राऊत शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

निवडणूक आयोगाला भेटणे औपचारिकता आहे. औपचारिकता म्हणजे भींतीवर डोके आपटून घेण्यासारखे आहे. पण ही लोकशाही व्यवस्थेने निर्माण केलेली संविधानिक व्यवस्था असल्याने आमच्या भूमिका वारंवार त्यांच्या समोर मांडाव्या लागतील. 14 ऑक्टोबर, 2025 रोजी साडे बारा वाजता निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाईल. या शिष्टमंडळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मनसे प्रमुख राज ठाकरे, कॉ. अजित नवले, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. सुभाष लांडे, जयंतराव पाटील यांचा समावेश असून अबू आझमी यांनाही आमंत्रण दिले आहे, असे राऊत म्हणाले.

Comments are closed.