शत-प्रतिशत भाजपा! मिंधे आणि अजित पवार गटाचे 25-30 आमदार भाजपात जाणार, संजय राऊत यांचा दावा
अजित पवार आणि मिंधे यांचा एक गट भविष्यात भारतीय जनता पक्षात विलीन होतील, असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील राजकारणतील सद्यपरिस्थितीवर भाष्य केले. अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार त्या गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे अजित पवारांचे सहकारी होते. आगामी काळात सुनेत्रा यांचे सहकारी ते असतीलचं असं नाही. त्यांच्या गटाच्या अंतर्गत बाबींवर दुसऱ्याने का बोलावं? त्यांनी काय पत्र लिहिलं त्यात त्यांनी पत्रात कोणाला पद दिली किंवा कोणती पद रद्द केली, हा त्यांचा पश्न असल्याचे राऊत यांनी सांगितले.
ते म्हणाले की, एक मी खात्रीने सांगेन की, भविष्यात हा गट 25 ते 30 आमदारांसह भाजपमध्ये विलीन होईल. त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल, हे आत्ता सांगणार नाही. त्याचबरोबर मिंधे गटाचे तितकेच आमदार हे भाजपात विलीन होतील. दोन्ही गटाचे 25-30 आमदार भाजपात जाण्याच्या मानसिकतेत आहे.फक्त त्यांना काही काळ ‘वेट अॅण्ड वॉच’ ही भूमिका घेण्यास सांगितले आहे. सुनेत्रा पवारांचा गट आणि मिंधेचा गट यांना भविष्यात भाजपमध्ये विलीन व्हावचं लागेल, असा दावाही राऊत यांनी केला.
निवडणूकीच्या एक वर्षआधीच हे सगळे आपल्याला भाजपमध्ये बघायला मिळतील
ते पुढे म्हणाले की, कोणत्याही परिस्थिती भविष्यात मिंधे गटाचे आणि अजित पवार गटाचे 25 ते 30 आमदार हे विशिष्ट वेगळा गट करून भाजपमध्ये विलीन होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असेल. निवडणुकीच्या एक वर्षआधीच हे सगळे आपल्याला भाजपमध्ये बघायला मिळतील. आता शत:प्रतिशत: भाजपा. म्हणून न्यायालयाचे निकाल पुढे ढकलले जातायत. कारण न्यायालयाला माहित आहे की, घटनेनुसार संविधानानुसार, पक्षांतर विरोधी कायद्यानुसार, पक्ष आणि चिन्ह मिंधे आणि अजित पवार गटाला मिळूच शकत नाही. एक तर ते स्तगित होईल किंवा मूळ शिवसेनेला मिळेल. म्हणून ते आजचं मरण उद्यावर ढकलतायत. तो निकाल येण्याआधी त्यांना भाजपमध्ये आपला गट विलीन करावा लागेल, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
Comments are closed.