Sanjay Raut criticism of the Mahayuti government on issue of Ladaki Bahin Yojana PPK


लाडक्या बहि‍णींना 1500 रुपये देण्यासाठी लाडक्या बहि‍णींच्या भावांना आणि नवऱ्याला हे सरकार दारुडे करणार आहेत, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई : लाडक्या बहि‍णींना 1500 रुपये देण्यासाठी लाडक्या बहि‍णींच्या भावांना आणि नवऱ्याला हे सरकार दारुडे करणार आहेत. 1500 रुपयांसाठी संपूर्ण महाराष्ट्र दारुडा करण्याची योजना असेल तर हे अत्यंत गंभीर आहे, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. खासदार राऊत यांनी बुधवारी (ता. 25 डिसेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लाडकी बहीण सारख्या योजनामुळे सरकारी तिजोरी मोकळी झाली असून महसुली तूट वाढली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्या बैठकीमध्ये दारुच्या दुकानांचे परवाने वाढवण्यावर चर्चा झाली, याबाबतची विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊतांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. (Sanjay Raut criticism of the Mahayuti government on issue of Ladaki Bahin Yojana)

प्रसार माध्यमांसमोर खासदार संजय राऊत म्हणाले की, लाडक्या बहि‍णींना दीड हजार रुपये देण्यासाठी लाडक्या बहि‍णींच्या भावांना, नवऱ्यांना हे सरकार दारुडे करणार आहेत. 1500 रुपयांसाठी संपूर्ण महाराष्ट्र दारुडा करण्याची योजना असेल तर हे अत्यंत गंभीर आहे. दारुची दुकाने वाढवणार, ड्राय डे कमी करणार, त्यानंतर शॉप आणि मॉलमधून दारू विक्री करण्याचेही प्रपोजल आलेले आहे. काही राज्यात घरपोच दारुही मिळते. काहीही करून लाडक्या बहि‍णींना 1500 रुपये देण्यासाठी घराघरात दारू पोहोचवा असे सरकारचे नवीन व्हिजन दिसत आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

– Advertisement –

हेही वाचा… Sanjay Raut : जोपर्यंत अटलजींकडे भाजपाचे नेतृत्व…, काय म्हणाले राऊत?

तसेच, लाडक्या बहि‍णींना 1500 रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहि‍णींच्या घरात बेवडे, दारुडे निर्माण करायचे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणारा हा प्रकार आहे. महसूल वाढवण्यासाठी अजित पवार यांच्यासारखा नेता हा विचार करत असेल तर हे राज्याचे दुर्दैवच म्हणायला हवे. हा त्यांचा विचार असेल तर त्यांनी त्यांच्या होर्डिंग्जवर किंवा कार्यक्रमात शाहू, फुले, आंबेडकर यांचे फोटो लावणे बंद केले पाहिजे, अशी जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

– Advertisement –

भविष्यात योजना बंद होईल…

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे निकष आणखी कठोर करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. भविष्यात सरकार अशी योजना बंदही करू शकते. लाखो, हजारो कोटींचे ओझे घेऊन आणि भ्रष्टाचाराची लुटमार सुरू ठेऊन हे राज्य चालवणे सोपे नाही. निवडणुकीच्या आधी मतांसाठी कोणतेही निकष न लावता पैसे वाटले आणि निवडणुका जिंकल्यावर निकष लावण्यात येत आहेत. त्यात दारू दुकानांचे परवाने वाढवणे हा गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना 1500 रुपयात आपण घरामध्ये कोणते विष आणतोय याचे चिंतन केले पाहिजे, असे राऊतांकडून सांगण्यात आले. तर, 40 रुपये लसूण 400 रुपयांवर गेली आहे. 1500 रुपये देता पण जेव्हा बहीण मार्केटमध्ये जाते तेव्हा ती थैली रिकामी घेऊन येते. 1500 रुपयात काही येत नाही, असा टोलाही यावेळी राऊतांनी लगावला आहे.


Edited By Poonam Khadtale



Source link

Comments are closed.