बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांनी तुम्हाला चौकटीच्या बाहेर जाऊन मदत केली त्यांचे पक्ष तुम्ही लोफर लोकांच्या हाती दिले – संजय राऊत

माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी राजकारण न पाहता मदत केली आणि त्यांचेच पक्ष फोडले, उपकाराची परतफेड अपकाराने केली असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच त्यांचे पक्ष फोडून लोफर लोकांच्या हाती हे पक्ष दिले असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, 100 दिवसांपेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहिलो. ते तुरुंगातले अनुभव आहेत आणि त्यानिमित्ताने भुतकाळात ज्या घटना घडल्या आहेत त्या या तुरुंग माझ्या प्रवासाशी संबंधित आहेत. ज्यांनी आम्हाला राजकीय सुडापोटी तुरुंगात पाठवलं, त्यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी त्यांना अडचणीच्या काळात कशी मदत केली हे मला तरुंगात असताना लक्षात आल्या यातल्या अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. गेल्या अनेक वर्षात मी माझ्या डोळ्यांनी अनेक घटना पाहिल्या आहेत, ऐकल्या आणि अनुभवलेल्या आहेत. अनेकांनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या या प्रवासावर पुस्तक लिहा. पण मी असं सांगितलं की ज्या गोष्टी वरिष्ठ नेत्यांसोबत केलेल्या आहेत, त्याला आपण सिक्रेट मिशन म्हणतो त्या पुस्तक रुपाने लिहून प्रकाशित करणं हे नैतिकतेला धरून नाही. काही गोष्टी या गोपनीय असायलाच पाहिजे. मी फक्त एक संदर्भ दिला. गेल्या 30-35 वर्षात काय काय घडत होतं या विषयी अनेक घटना मला माहित आहे. मी फक्त एकच संदर्भ दिला की माननीय बाळासाहेब असतील किंवा शरद पवार असतील या महाराष्ट्रातील दोन प्रमुख नेत्यांनी त्यांचा स्वभाव होता राजकारण न पाहता मदत करण्याचा. त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही प्रमुख पक्ष कसे फोडले माणसं कशी फोडली आणि पक्ष फोडण्यासाठी अट्टाहास कसा केला, हा एक वेगळा प्रकारचा स्वभाव राजकारणात आम्हाला दिसला. म्हणजे उपकाराची फेड ही अपकाराने कशी केली. आता हे भाजपच्या लोकांचं मी ऐकत होतो त्यांना काय माहित ते कुठे होते. भाजपच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घ्यावी आणि त्यांच्याशी बोलावं. मी लिहिलेल्या घटना 100 टक्के सत्य आहे. या पेक्षाही मी जास्त लिहू शकलो असतो, मी लिहिलं असतं तर हाहाःकार माजला होता. मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा आणि संयम पाळला. यापेक्षा असंख्य घटनांचा मी साक्षीदार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना हे नाकारता येणार नाही. मी प्रदीर्घ काळ बाळासाहेबांसोबत राहिलेला माणूस आहे. त्यामुळे अनेक घडामोडींचा मी एकमेव साक्षीदार आहे. पण मी त्या कधीच बोलणार नाही आणि लिहिणार नाही. पण नरकातला स्वर्ग हा वेगळाच प्रवास आहे. आणि त्यानिमित्ताने आपण जेव्हा तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो राज ठाकरेंच्या भाषेत तेव्हा जुने संदर्भ आठवतात. त्यासाठी तो अनुभव घ्यावा लागतो, घाबरून पळून जावं लागत नाही असे संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे माझे चांगले मित्र होते, त्यांचे आणि माझे चांगले संबंध होते. राजकारण जरी वेगळं झालं तरी संकटकाळात घरच्यांना, कुटुंबांना दिलासा देणारा एखादा फोन जरी गेला तरी एक आधार असतो की कुणतरी आपल्यासोबत आहे. कारण ज्या पद्धतीने आमच्यावरती संकटांचा पहाड कोसळला होता, व्यक्तीशः नव्हे तर कुटुंबावर. तेव्हा एक काडीचाही आधार असतो, कुणीतरी फुंकर मारतं ते महत्त्वाचं असतं.

तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे न्यायमूर्ती, राष्ट्रपती, पंतप्रधानांशी आदराचे संबंध होते. बाळासाहेबांनी आमच्याशी केव्हातरी बोलावं अशी त्यांची इच्छा असायची. बाळासाहेबांनी आमच्याशी बोलावं हा आमचा प्रसाद आहे अशी त्यांची भावना होती. जेवढं मला शक्य आहे तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न मी पुस्तकाच्या रुपाने दिली आहे असेही संजय राऊत म्हणाले.

भाजपच्या नेत्याने मला सांगितलं होतं की तुम्ही जे सरकार बनवलं आहे ते कुठल्याही परिस्थितीत पाडायचे हे दिल्लीत ठरलं आहे. मी म्हटलं तुम्ही बेकायदेशीरपणे सरकार कसं पाडणार? ते म्हणाले आम्ही पाडू शकतो पण मला तुमची चिंता वाटते तुम्ही माझे मित्र आहात. तुम्ही यात पडू नका अन्यथा तुम्हाला तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे असं ते म्हणाले. मी म्हटलं मी काय केलंय? ते म्हणाले काही करण्याची आवश्यकता नाही. देशात कुणाचं राज्य आहे आणि ते कसं चाललंय हे तुम्हाला माहित आहे. त्यानंतर ताबडतोबत या वृत्तांत राज्यसभेचे चेअरमन व्यंकय्या नायडू यांना कळवला. कारण मी राज्यसभेचा सदस्य आहे. मला अमूक तमूक व्यक्तीने धमक्या दिल्या आहेत. आणि ही बाब एक दोन महिन्यात सत्य झालं.

पक्ष फोडला, आमदार फोडले, खासदार फोडले याचे आम्हाला इतके दुःख नाही. पण बाळासाहेबांचा पक्ष तुम्ही एका लोफर माणसाच्या हाती दिला. हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही तुम्ही कुणाच्या हाती दिली तर लोफर माणसाच्या हाती. एकनाथ शिंदे यांचे राजकारण त्यांच्यापाशी. पण ते शिवसेनचे मालक कसे बनवू शकता, तुम्ही कोण आहात. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, ज्या शरद पवारांनी तुम्हाला चौकटीच्या बाहेर जाऊन मदत केली त्यांचे पक्ष तुम्ही लोफर लोकांच्या हाती दिले. हे त्यांना शोभलं नाही. म्हणून चिडून एक लहानसा संदर्भ दिला. आतापर्यंत मी या विषयावर लिहिलं नाही, बोललो नाही. कारण काही गोष्ट गोपनीय असतात. माझे पितृतुल्य ज्यांना मी सर्वस्व मानतो त्यांच्याकडून अनेक गोष्टी मी ऐकल्या पाहिल्या, सहभागी झालो अशा विषयांमध्ये आम्ही कधीच पाहिलो नाही.

भाजप नेत्यांनी आरोप केला आहे की सनसनाटी पसरवण्यासाठी संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. सनसनाटी पसरवण्यासाठी संजय राऊत यांना पुस्तक लिहिण्याची गरज नाही. पण मी लिहिलेलं हे पुस्तक आहे ही कांदबरी नाही. पंतप्रधान मोदी सांगतात तशा कपोकल्पित मनोहर कथा नाहीत. या सत्यकथा आहेत असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Comments are closed.