गॅस टंचाईच्या अफवा गुजरातमधून पसरत आहे, त्या राज्याविरोधात गुन्हा दाखल करा; संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गॅसची टंचाई आहे की नाही याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळातच एकमत नाही अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच गॅस टंचाईबाबत जर गुन्हा दाखल करायचा असेल तर गुजरात राज्याविरोधात करा कारण या अफवा तिथूनच येत आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की लॉकडाऊन, गॅस टंचाई वगैरेच्या अफवा पसरवणं हा अपराध आहे, त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. पण महाराष्ट्रामध्ये ठीक ठिकाणी गॅसच्या रांगेमध्ये लोक आजारी पडतायत आणि स्वतः तुमचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणतात की गॅसची टंचाई आहे म्हणून. आधी कॅबिनेटमध्ये एकमत आहे की नाही ते पहा. मुख्यमंत्री म्हणतात सगळं ठीक आहे, अन्न नागरी पुरवठा मंत्री त्यांची वेगळी भूमिका आहे. त्यांनी म्हटले की विशिष्ट कालमर्यादेच्या पलीकडे आम्ही हा गॅस पुरवू शकत नाही. तुमच्या सरकारमध्येच मतभेद आहेत, तुमचेच लोक गॅसवर आहेत. पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्हाला सिलेंडरचे वितरण करावं लागतं. मग या अफवा कोण पसरवतंय?

या अफवांचा उगम गुजरात मधून झाला आहे असे संजय राऊत म्हणाले. सगळ्यात जास्त रांगा या गुजरातमध्ये लागल्या आहेत. जसं नोटबंदी होण्या संदर्भातली पहिली माहिती ही गुजरातमध्ये कळली आणि गुजरातमध्ये आठ दिवस आधीच लोकांनी बँकेत रांगा लावून आपले काळा पैसा आत टाकला. अमित शहा यांच्या बँकेमध्ये एका तासामध्ये पाचशे कोटी रुपये जमा झाले होते. गुजरातचे गृहमंत्री आणि पंतप्रधान असल्यामुळे त्यांना ही बातमी लवकर कळते. गुजरातमध्ये ज्या रांगा लागलेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लागेल ही धास्ती आहे. ही गुजरातून आलेली हवा आहे. गुजरातमधल्या पेट्रोल पंपावरच्या किंवा गॅससाठी रांगा लागल्या आहेत. लोक मोठ मोठे पाण्याचे ड्रम घेऊन रांगेत उभे आहेत. देशभरामध्ये टंचाईच्या अफवा पसरवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना जर गुन्हा दाखल करायचा असेल तर गुजरात राज्याविरुद्ध करावा असेही संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.