फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मिंधेकडून आंदोलकांना मदत, संजय राऊत यांची टीका

मराठा आरक्षणप्रकरणी फडणवीसांची भूमिका वेगळी, ते परशूराम महामंडळवाले आहेत तर अजित पवार हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मिंधेकडून आंदोलकांना मदत असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे. जर हा विषय केंद्राच्या अखत्यारितला असेल तर सरकार महाशयसुद्धा आपलं आहे. आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांचंही वजन आहे. फडणवीसांचे वजन मोदींकडे तर शिंदे यांचे वजन अमित शहांकडे आहे. त्या दोन्ही नेत्यांना या नेत्यांचे मन वळवण्याचे काम आणि कायदा करण्याचे काम या दोन नेत्यांनी केले पाहिजे. मराठी माणूस पावसात भिजलाय, चिखलात बसलाय. महाराष्ट्रासाठी हे चित्र बरं नाही.

समाजाचे नेतृत्व करणारे लोक आहेत ते फडणवीसांचे चेले आहेत. फडणवीस सांगतील ते लोक तसेच वागत आहेत. या विषयावर फडणवीसांनी संविधानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नये. राजकीय इच्छाशक्तीचा एल्गार कुणी केला होता? संविधानाच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले पाहिजे ही बाब बरोबर आहे. पण संविधान बदलण्याचे काम सातत्याने सुरू आहे. आमदार खासदारांना अटक करण्यासाठी संविधान बदललं ना. तुम्ही त्या साठी संविधान बदलू शकता. मग महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे, तो त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे, मग त्याच्यासाठी संविधान बदलायला हरकत काय? देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राशी खोटं बोलू नका. आता तुम्ही संविधानाच्या गोष्टी करत आहात, कालपर्यंत तुम्ही राजकीय इच्छाशक्तीच्या गोष्टी करत होतात. मग राजकीय इच्छा शक्ती की संविधान? आणि तसे असेल तर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची माफी मागा. कारण तुम्ही त्या सरकारला राजकीय इच्छाशक्तीची आठवण करून दिली होती. ती राजकीय इच्छाशक्ती तुमच्याकडे नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यावर महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षातल्या नेत्यांशी चर्चा केली पाहिजे. जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत, जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करा. अहंकार बाजूला ठेवा. आणि त्यांच्यासह जरांगेंची भेट घेतली पाहिजे, संपूर्ण कॅबिनेटसह. आणि त्यातून काय मार्ग काढता येईल यासाठी सामुदायिक निर्णय घेणे गरजेचे आहे. सरकारमध्ये तीन गट आहेत. मिंध्यांचा विषय वेगळा आहे, फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मिंधे आंदोलकांना मदत करत आहेत. फडणवीसांची भूमिका वेगळी आहे ते परशूराम महामंडळवाले आहेत. आणि अजित पवार हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत. अशा परिस्थितीत राजकीय इच्छाशक्ती येणार कुठून. आणि संविधानाची चौकट बदलणार कशी? आणि यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे प्राण पणास लागले आहेत. आणि त्यांचे हजारो आंदोलक पावसात बसलेले आहेत असे संजय राऊत म्हणाले.

तसेच भाजपकडून आपल्या खांद्यावरचा ढेकूण ढकलून देण्याचा प्रकार आहे. आमच्यात राजकीय इच्छाशक्ती नाही ही फडणवीसांची भूमिका होती. आता ते सत्तेत आहेत मग आणा ना राजकीय इच्छाशक्ती. न्यायालयाने दिलेलं आरक्षण नाकारलं असं म्हणतात कारण संविधान आहे. हे जर या मुर्ख मंत्र्यांना कळत असेल म्हणूनच फडणवीस संविधानाची चौकटीची भाषा करत आहेत ती यासाठीच. तुम्ही घाईघाईने ते आरक्षण दिलं, तुम्ही संविधानातील कलमांचा अभ्यास केलेला नाही. तुम्हाला संविधानात बदल करावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदींच्या दरबारात जावं लागेल. संविधानाची चौकट पाळून तुम्हाला जे करायचं आहे ते करून घ्या आम्ही तुमच्यासोबत आहोत. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकलं नाही कारण त्यात काही संविधानिक त्रुटी होत्या. तुम्हीच नेमलेले आम्ही वकील दिले होते. तुमच्याच भूमिका आम्ही मांडल्या. जर ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नसेल तर त्या पद्धतीचे संविधानिक बदल करून नवा प्रस्ताव आपल्याला मांडावे लागतील. आणि त्यासाठी फडणवीसांना शहा आणि मोदींकडे जावं लागेल असेही संजय राऊत म्हणाले.

अमित शहा मुंबईत येणार आहेत. शहांनी गणपती दर्शन करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्त्यांची भेट घ्यायला हवी. फडणवीसांनी शहांना जरांगे पाटील यांच्यासमोर न्यायला पाहिजे होतं. तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, तुमच्या अखत्यारित हा विषय येतो. आरक्षणाचा विषय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येतो. आपण मुंबईत देवांच्या नावाखाली चमकोगिरी आणि राजकारण करायला येत आहात, आमचाही जनतारुपी पांडुरंग बसला आहे त्यांचेही दर्शन घ्या असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Comments are closed.