माणसं प्रेमानं जिंकता येतात, मग 50-50 कोटींचा काय प्रकार होता? संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
विधान परिषद निवडणुकीत झालेल्या घोडेबाजारावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार कसा झालाय ते आम्हालाही माहीत आहे आणि तुम्हालाही, मला तोंड उघडायला लावू नका, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणसं प्रेमाने जिंकता येतात, असे म्हटले होते. यावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. माणसं प्रेमाने जिंकता येतात, मग 50-50 कोटींचा काय प्रकार होता? असा सवाल राऊत यांनी रविवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना विचारला.
माणसं प्रेमाने जिंकता येतात, पैशाने नाही असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत फडणवीसांवर निशाणा साधत मग 50-50 कोटींचा काय प्रकार होता? असा सवाल केला. ते पुढे म्हणाले की, एवढेच प्रेम असेल आणि 50-50 कोटी प्रेमाने देणार असतील तर इतरांनाही प्रेमाने पाठवून द्या. सरकार बनवण्यासाठी तुमच्याबरोबर येता आहेत त्यांनाच फक्त 50-50 कोटी कशाला. राज्यात खूप गरीब लोक असून त्यांच्यापर्यंतही हे पैसे पोहोचवा.
घोडेबाजाराचे आपल्याकडे पुरावे असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्याकडेही तुमच्या हजार गोष्टी असल्याचे म्हटले. यावरही संजय राऊत यांनी भाष्य करत त्या हजार गोष्टींचे पत्ते पिसत बसा असा टोला लगावला. महाराष्ट्रात कसला खेळ चाललाय? विधान परिषदेमध्ये घोडेबाजार झाला हे मान्य करा. बिनविरोध निवडणुका घेण्याचे काही कारण नव्हते. त्यासाठी एका दिवसात 150 कोटी खर्च झाले. हे कशासाठी झाले? हे पैसे कोण आणले? कुठून आले? हे चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, मिंधे गटासह सगळ्यांना माहिती आहे, असेही राऊत म्हणाले.
निवडणूक पद्धतीत सुधारणा आवश्यक असल्याचेही फडणवीस म्हणाले होते. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, यासाठी बील कशाला हवे? सगळ्यात आधी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि भाजपचीही मूळ मागणी हीच होती. दुसरी मागणी संविधानातील परिशिष्ट 10 च्या अंमलबजावणीबाबत आहे. या दोन मागण्या पूर्ण झाल्या तरी निवडणुकीत सुधारणा होईल. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकाही खुल्या मतदान पद्धतीने व्हायला हव्यात, तरच घोडेबाजार थांबेल.
एका चिन्हावर निवडून येऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा, सरकार बनवायचे आणि त्याला राज्यपालांचे समर्थन मिळवायचे. त्या गुन्ह्यात विधानसभा अध्यक्षांनाही सहभागी करून घ्यायचे. हे एकदा थांबले की निवडणूक सुधारणारच आहे. अशा प्रकरणात विधानसभा अध्यक्षांना कोणतेही अधिकार असता कामा नये. कारण विधानसभा अध्यक्ष हा राजकीय पक्षाचा चमचा असतो. तो एका पक्षाकडून आमदार निवडून येतो आणि तोच पक्ष त्याला विधानसभेचा अध्यक्ष करतो, असेही संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.