गुजरातच्या मदतीने महाराष्ट्राला ड्रग्स कॅपिटल बनवण्याचा घाट – संजय राऊत
मुंबईतील नेस्को ड्रग्ज प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात मुंबई आणि महाराष्ट्र हे ‘उडता पंजाब’ बनले असून राज्याला ड्रग्ज कॅपिटल बनवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. साताऱ्यातील दरे गावाजवळ देशातील सर्वात मोठी ड्रग्ज फॅक्टरी पकडली गेली होती, परंतु मंत्रिमंडळातील काही खास लोकांना वाचवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच हे प्रकरण दाबल्याचा खळबळजनक दावा राऊत यांनी यावेळी केला. या राजकीय वरदहस्तामुळेच आज संपूर्ण महाराष्ट्र ड्रग्जच्या विळख्यात अडकला असून त्याचे गंभीर परिणाम राज्याला भोगावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
संजय राऊत यांनी यावेळी गुजरात कनेक्शनवरही बोट ठेवले. गुजरात हे देशातील सर्वात मोठे ड्रग्ज केंद्र बनले असून मुंद्रा बंदरावरून लाखो कोटींचे अमली पदार्थ देशात येतात आणि मुंबईमार्फत ते संपूर्ण महाराष्ट्रात वितरित केले जातात, असा आरोप त्यांनी केला. गुजरातच्या मदतीने महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम सत्ताधाऱ्यांनी सुरू केल्याची टीका त्यांनी केली. ‘सबका साथ सबका विकास’च्या नावाखाली तरुण पिढी बरबाद होत असताना, फडणवीसांनी खोटे मोर्चे काढण्याऐवजी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला. ड्रग्जच्या विरोधात कडक पावले उचलल्यास फडणवीसांना खऱ्या अर्थाने माता-भगिनींचा आणि नारीशक्तीचा आशीर्वाद मिळेल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.