ज्याप्रकारे निवडणुका सुरू आहेत, ते निकोपं लोकशाहीचे लक्षण नाही – संजय राऊत
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत निशाणा साधला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सध्याच्या निवडणूक पद्धतीवर आणि राजकीय नैतिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ज्या विधान परिषदेमध्ये एकेकाळी आचार्य अत्रे, ग.दी. माडगुळकर, ना.धो. महानोर, विठ्ठलराव हांडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या अत्यंत अभ्यासू, ताकदीच्या व्यक्ती जात होत्या, त्या सभागृहाचे आता दुर्दैवाने ‘डंपिंग ग्राऊंड’ झाले आहे. सध्या ज्या प्रकारे निवडणुका पार पडत आहेत, ते निकोप लोकशाहीचे लक्षण अजिबात नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आजच्या काळात कार्यकर्त्यांची निवडणूक उरलेली नसून, ज्याच्याकडे मतदारांना विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपये आहेत, तोच ही निवडणूक चांगल्या प्रकारे लढू शकतो. निवडणुकीत शंभर-शंभर, दीडशे-दीडशे कोटी खर्च करणारे उमेदवार मतदारांना पैसे वाटत आहेत आणि मतदारही सर्वच उमेदवारांकडून पैसे घेऊन आपल्या पुढील पाच वर्षांची बेगमी करत आहेत. यामुळे या निवडणुकांना आता कोणताही अर्थ उरलेला नाही, अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली.
नाशिकमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, नाशिकमध्ये आमच्या पक्षाचा कोणताही उमेदवार नाही. तेथील लढत आता पूर्णपणे महायुतीमध्येच रंगणार असून, ज्याच्या शेअरचा भाव जास्त असेल तोच निवडून येईल, यात कोणतेही संकटमोचक काही करू शकणार नाहीत असा टोला त्यांनी लगावला. तसेच नाशिकमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीबाबत कोणताही संभ्रम नव्हता, पक्षाने कोणालाही उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला नसल्याने ज्याची इच्छा असेल त्याने अर्ज घ्यावा, अशी भूमिका होती; त्यामुळे यात उद्धव ठाकरे यांना ओढण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशावर आणि उमेदवारीवर बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजपला लाज वाटली पाहिजे. कालपर्यंत ज्यांच्यावर आणि ज्यांच्या कारखान्यावर वैयक्तिक आरोप केले, ज्यांना कोर्टाच्या चकरा मारायला लावल्या आणि विधानसभेतून माघार घ्यायला लावली, अशा व्यक्तीला दबावाचे राजकारण करून दुसऱ्याच दिवशी उमेदवारी दिली जाते. विचारधारा बदलून पक्षात येणाऱ्यांना आणि त्यांना पक्षात घेणाऱ्यांनाही याची लाज वाटायला हवी. आज सामाजिक कार्याची पार्श्वभूमी नसलेल्या उद्योगपती, ठेकेदारांच्या मुलांना पैशांच्या जोरावर विधान परिषदेवर पाठवले जात आहे. असं काय त्यांनी मोठं सामाजिक कार्य केलं आहे? कोणीही असतील ते. आमच्यासारखे राजकीय कार्यकर्ते आहेत, जे एकाच विचारधारेला चिकटून राहिले. आमच्यासारखे हजारो लाखो लोकं महाराष्ट्रात आहेत, पण तुमच्याकडे फक्त संपत्ती आहे, इस्टेटी आहेत, पैसे आहेत म्हणून तुम्हाला विधानपरिषदेत आणायचे आहे. अशाप्रकारे विधान परिषद आणि राज्य सभा नसलेली बरी असं मला अनेकदा वाटतं असा संताप त्यांनी व्यक्त केला. शेवटी, भाजपविरोधात पुन्हा एकदा इंडिया आघाडी एकत्र येतील का असा माध्यमांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, त्यासंदर्भात आगामी 8 तारखेला दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची महत्त्वाची बैठक होणार असून, के. सी. वेणुगोपाल यांच्याकडून तसा निरोप आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
Comments are closed.