अशोक खरात प्रकरणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्र्यांनी भूमिका मांडावी, त्यांचे वडील खरातचे भक्त होते; संजय राऊत यांचा टोला

गेल्या दहा वर्षांत भाजपने देशाच्या जनतेला नामर्द आणि षंढ बनवण्याचं काम केलं आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच अशोक खरात प्रकरणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्र्यांनी भूमिका मांडावी, त्यांचे वडिल खरातचे भक्त होते असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी कोणीही लपून राहिलेलं आहे का? “हमाम में सब नंगे है.” अशोक खरात प्रकरणात सगळेच उघडे पडले आहेत. तुम्ही कुणा कुणाची नावं घेणार? मी फक्त एवढंच सांगेन की, खरातने जेवढी नावं घेतलेली आहेत, त्याच्याकडे कोण कोण येत होतं, ते पोलिसांनी किंवा SIT ने जाहीर करावं. या प्रकरणी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी बोलायला हवं. कारण त्यांचे वडील सुनील तटकरे हे अशोक खरातचे भक्त होते. त्यामुळे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल. अशोक खरात प्रकरणी तर महिला राष्ट्रपतींनीही बोललं पाहिजे.

महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये इतकं मोठं कांड घडलेलं आहे. देशाच्या राष्ट्रपतीपदी एक महिला आहेत. कालच राष्ट्रपती मथुरेला गेल्या आणि प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद घेतला. प्रेमानंद महाराजांनी त्यांचा उल्लेख “धर्मात्मा” असा केला होता. त्या जर धर्मात्मा असतील, किंवा आपण तसं मानत असू, तर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये असंख्य महिलांचं जे शोषण झालं आहे, त्या प्रकरणात सरकार काही महत्त्वाची माहिती दडपते आहे आणि अनेकांना वाचवण्याचा प्रयत्न करते आहे, अशा वेळी राष्ट्रपतींनी राज्यपालांना निर्देश दिले पाहिजेत. तसेच राज्यपालांनी यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे.

जेफ्री एपस्टीनला तुरुंगात मारलं, हे खरं आहे. जगभरातील नेत्यांची नावं त्याच्यामध्ये होती, त्यात भारतातीलही नेते होते. ती मोठी सुपारी होती. खरातच्या बाबतीतसुद्धा अनेक राजकारणी, उद्योगपती, आयएएस, आयपीएस अधिकारी असे अनेक लोक यात अडकलेले आहेत. मला असं वाटतं की नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरुवातीपासून या प्रकरणात जी तपासाची दिशा घेतली आणि त्या खरात बाबाला अक्षरशः मोडून काढलं. आपण पाहिलं असेल, तो मोडलेला चालताना दिसत होता. त्यामुळे तुरुंगातसुद्धा त्याची विशेष काळजी घेतली जाईल. तुरुंगात त्याच्यावर हल्ला होणं किंवा त्याला मारलं जाणं हे सरकारला परवडणार नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणतात. म्हणजेच विजय वडेट्टीवार यांच्याकडे यासंदर्भात काही माहिती असावी. ते विरोधी पक्षनेते होते, ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेस पक्षाचे आहेत. माहिती असल्याशिवाय ते असं बोलणार नाहीत असेही संजय राऊत म्हणाले.

खरात म्हणजे राष्ट्रपती नाही. त्याच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे. खरातच्या सुरक्षेवर बोलण्याचा इथे काय संबंध? कसाबच्या सुरक्षेवर बोलण्याचा काय संबंध? कसाबसाठी तर आर्थर रोड जेलमध्ये विशेष कारागृह उभारण्यात आलं होतं आणि कसाबला फाशी दिल्यानंतर त्या जेलमध्ये आम्हाला ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे आता कसाबला फाशी झाल्यानंतर त्या जेलमध्ये कोण जाणार आहे, तेवढंच राजकारण बघा असे संजय राऊत म्हणाले.

सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्समध्ये CISF, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF), इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) यांचा समावेश होतो. हे सगळे फोर्सेस आपले विमानतळ, सार्वजनिक ठिकाणं, संसद, सीमा सुरक्षा अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळतात. या संदर्भात एक विधेयक काल लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. आम्ही या विधेयकाला विरोध केला. कारण या फोर्सेसची प्रतिष्ठा कमी करण्याचं काम करण्यात आलं आहे आणि त्यांच्या प्रमुखपदी आयपीएस अधिकाऱ्यांना नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला या फोर्सेसचा विरोध आहे. “लढने को हम और खाने को तुम” अशी भूमिका यात दिसते.

आतापर्यंत पुलवामा हल्ल्यात कोण बळी गेले? हेच फोर्सेस बळी गेले. 40 जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढाईतही हेच फोर्सेस आघाडीवर असतात. अनेक व्हीआयपींच्या सुरक्षेत, संसद सुरक्षेतही हेच फोर्सेस काम करतात. पण आता या फोर्सेसमधून कोणीही डायरेक्टर जनरल (DG) होणार नाही, त्यांना प्रमोशन मिळणार नाही. ती प्रमोशन्स डेप्युटेशनवर येणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांना दिली जातात. त्यामुळे या फोर्सेसमध्ये असंतोष आहे. हा शिस्तबद्ध आणि सशस्त्र दल आहे. अशा दलामध्ये असंतोष आणि अशांतता निर्माण झाली, तर भविष्यात काही गंभीर घडू नये, असा इशारा मी काल संसदेत दिला आहे असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Comments are closed.