2014 नंतर भाजपने धार्मिक देशाला धर्मांध केलं! संजय राऊत यांचा घणाघात
2014 नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला. भारतीय जनता पक्षाने आपल्या राजकीय स्वार्थासाठी गेल्या 10 वर्षांत देशाला टोकाचं धर्मांध केलं. आजही तुम्ही 10 किलो धान्य देऊन मतं विकत घेताय? ईव्हीएम घोटाळ्यातून निवडणून आलेले पंतप्रधान आहेत, गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार सुद्धा आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा समाचार घेतला.
ठिकठिकाणी तिरंगा फडकलेला आहे. आणि आजही या देशामध्ये बरोजगारी भूक, कायदा-सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा याची गंभीर समस्या आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता 75 वर्षांचे होतील आणि देशाचं स्वातंत्र्य 79 वर्षांचं झालं. या 79 वर्षांमध्ये देश नक्कीच प्रगती पथावर गेला. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशामध्ये एक सुई आणि धागाही बनत नव्हता. आज तो देश अनेक बाबतीत पुढे गेला. त्याचं श्रेय या देशाचं नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांना जातं. काही लोकांना वाटतं 2014 मध्ये देश स्वतंत्र झाला. पण 2014 नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला. यावर चर्चा न करता आता आपण देशाला स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देऊ या. या देशातले आदिवासी सोशित, पीडित ज्यांनी अद्याप स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेला नाही त्यांच्यापर्यंत यापुढे तरी स्वातंत्र्याची किरणे जावीत या आपण शुभकामना देऊ या, असे म्हणत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.
79th Independence Day – शिवसेना भवन प्रांगणात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
“भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षांत हा देश धर्मांध केला”
प्रत्येक पंतप्रधानांनी काहीना काही योगदान दिलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचं योगदान इतकचं आहे गेल्या 10 वर्षांत, हा देश धार्मिक होता तो त्यांनी धर्मांध केला. भारतवर्ष ज्याला आपण म्हणतो हा देश कमालीचा श्रद्धाळू, धार्मिक होता. त्या श्रद्धाळू, धार्मिक देशाला भारतीय जनता पक्षाने आपल्या राजकीय स्वार्थासाठी गेल्या 10 वर्षांत टोकाचं धर्मांध केलं. आणि ही धर्मांधता या देशात जातीय, धार्मिक फूट पाडतेय. आणि ती देशाच्या स्वातंत्र्याला अत्यंत धोकादायक आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
“स्वदेशीचा नारा ही काँग्रेसची देणगी, मोदी आज काँग्रेसवादी, नेहरूवादी आणि गांधीवादी झाले”
आधी पंतप्रधानांनी स्वतःपासून सुरुवात करावी. स्वदेशीचा जो नारा पंतप्रधानांनी दिलेला आहे हा नारा ही काँग्रेस पक्षाची देणगी आहे. ते काँग्रेसने काय दिलं विचारतात ना? स्वदेशीची देणगी, स्वदेशीचा नारा हा या देशातमध्ये स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरसुद्धा काँग्रेस पक्षाने दिला. महात्मा गांधींनी दिला, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिला म्हणून तर ही खादी आली. ब्रिटिश कापडाची होळी करा आणि स्वदेशी वापरा त्यातून खादी आली गांधी टोपी आली. एक दिवस मोदी गांधी टोपी घालून भाषण करतील शेवटचा त्यांचा काळ चालू आहे. स्वदेशीचा नारा ही काँग्रेसची देणगी आहे आणि मोदी आज काँग्रेसवादी, नेहरूवादी आणि गांधीवादी झाले, असे म्हणत संजय राऊत स्वदेशीचा नारा देणाऱ्या पंतप्रधान मोदींवर टीका केली.
“ट्रम्पचं नाव घ्यायला लाजताय कशाला आणि घाबरताय कशाला?”
मोदी कोणाचंही नाव घेऊन कोणाला इशारा देत नाहीत. तेवढी हिंमत त्यांच्यामध्ये नाही. ते कोणाचं नाव घेत नाही. मराठीमध्ये एक गाणं आहे, नाव घेना पोरी लाजू नको… हे त्यांच्यासाठीच आहे. ट्रम्पचं नाव घ्या, देशाच्या शत्रूचं नाव घ्या, खुलेआम घ्या. पंडित नेहरूंचं नाव काय घेता, त्यांनी देश घडवला त्यांचच नाव घेतात ते. ट्रम्प बुच मारतोय, रोज देशाला शिव्या घालतोय. तुम्हाला शिव्या घालतोय. ट्रम्पचं नाव घ्यायला लाजताय कशाला आणि घाबरताय कशाला. आम्ही घेतोय ना, अमेरिकेत जाऊन नाव घेऊ, व्हाईट हाऊस समोर जाऊन नाव घेऊ, भाषणातून मोदींनी ट्रम्प यांना इशारा दिला? या प्रश्नावर उत्तर देत संजय राऊत यांनी टोला लगावला.
“मोदींनी ट्रम्पला आव्हान दिलं पाहिजे”
पाकिस्तानला इशारा देणं खूप सोपं आहे. पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे. जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे, हे मोदी कसे विसरतात. लाल किल्ल्यावरून त्यांनी खोटं भाषण करू नये. पाकिस्तानचा जो आर्मी चीफ आहे जनरल मुनीर जो हिंदुस्थानला अणुयुद्धाच्या धमक्या देतोय त्या मुनीरला ट्रम्पने व्हाईट हाऊसमध्ये जेवायला बोलावलं. आपल्या आर्मी चीफला बोलावलं? नाही. मग मोदींनी ट्रम्पला आव्हान दिलं पाहिजे. आणि या पाकिस्तानच्या मागे चीन आहे. नुसतं पाकिस्तानला दम देऊन चालणार नाही. चीनला दम दिला पाहिजे पाकिस्तानच्या मागे उभे रहाल तर याद राखा, असे संजय राऊत म्हणाले.
“आजही तुम्ही 10 किलो धान्य देऊन मतं विकत घेताय?”
सोशित, पीडीत, दुर्बल यांच्यापर्यंत अद्याप स्वातंत्र्य पोहोचलेलं नाही. आजही लोक भुके, कंगाल आहेत. मोदी भाषण करतात लाल किल्ल्यावरून, आजही 80 कोटी जनतेला पाच किलो दहा किलो जगण्यासाठी धान्य देतातेहत. ही मोदींच्या गेल्या 10 वर्षांतल्या स्वातंत्र्याची शोकांतिका आहे. आजही तुम्ही 10 किलो धान्य देऊन मतं विकत घेताय? अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“…तर भारतीय जनता पक्ष औषधालाही शिल्लक राहणार नाही”
हरयाणातल्या पानीपतमधलं एक गाव आहे. 2022 मध्ये तिथे सरपंचपदाची निवडणूक झाली. तो उमेदवार पराभूत झाला. निवडणूक ईव्हीएमवर झाली. त्याला विश्वास होता हा निकाल चुकीचा आहे. भाजपल्यांनी गडबड केली आहे. सेशन कोर्ट, मग हायकोर्टात गेला. कोणीही त्याला न्याय दिला नाही. त्याची एकच मागणी होती की त्या भागातल्या बुथ क्रमांक 69 मधली मतमोजणी पुन्हा करा. सुप्रीम कोर्टात त्याने आपली बाजू मांडली. सुप्रीम कोर्टाने फक्त 69 क्रमांकाचा बुथ नाही तर सगळ्या ईव्हीएम मागवल्या. आणि आपल्या समोर मतमोजणी केल्यावर पराभूत उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाला. याचा अर्थ असा की ईव्हीएम घोटाळे करून तुम्ही जिंका. पण आम्ही सगळे लोक ते पराभूत झाल्यावर फक्त भाजपच्या आणि निवडणूक आयोगाच्या नावाने खडे फोडतो. पण जर मोहीतकुमार या उमेदवाराप्रमाणे आम्ही शेवटपर्यंत लढाई केली तर भारतीय जनता पक्ष औषधालाही शिल्लक राहणार नाही. ईव्हीएम घोटाळ्यातून निवडणून आलेले पंतप्रधान आहेत, गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार सुद्धा आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
Comments are closed.