“देशामध्ये फक्त भाजप आणि संघाच्या लोकांना धोका, खरे म्हणजे त्यांना कुणी चापटही…”, अंबादास दानवेंच्या सुरक्षेवरून संजय राऊत यांचा टोला
शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. देशामध्ये फक्त भाजप आणि संघाच्या लोकांना धोका आहे. खरे म्हणजे त्यांना कुणी चापटही मारणार नाही, निरर्थक लोक आहेत ते, असे राऊत शनिवारी मालेगाव येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, खरे सांगायचे तर कुणीही सुरक्षेचा फार सोस धरू नये. या देशामध्ये फक्त भाजपच्या लोकांना आणि संघाच्या लोकांना धोका आहे. त्यामुळे त्यांना झेड प्लस, डबल झेड प्लस, कमांडो, एनएसजी कमांडो सुरक्षा मिळते किंवा शिंदेंचे जे लोक फुटून जातात त्यांना सुरक्षा आणि बाकी इतर पक्षातील प्रमुख लोक निर्भय आहेत.
आमच्या आसपास येण्याची कुणाची हिंमत नाही. त्याच्यामुळे सुरक्षा काढली काय किंवा ठेवली काय त्याचा बाऊ करू नये. कारण सुरक्षा कुणाला मिळते, तर भाजप-शिंदे गटाच्या लोकांना. खरे म्हणजे या देशात सर्वाधिक धोका त्यांना अजिबात नाही. त्यांना कुणी चापटही मारणार नाही. सर्व निरर्थक लोक आहेत. पण सुरक्षा घेऊन आम्ही कुणीतरी खूप मोठे आहेत, आमच्या जीवाला किती धोका आहे, आम्ही किती राष्ट्रकार्य करतो हे दाखवण्याचा प्रयत्न. त्यांचे राष्ट्रकार्य काय आहे दे दिसतेय, असेही राऊत म्हणाले.
तुमच्या आपापसातील गटबाजीमुळे तुम्ही महापौरपद गमावले!
चंद्रपूरबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, तुमच्या आपापसातील गटबाजीमुळे तुम्ही महापौरपद गमावले, आम्ही तुमच्याबरोबरच होतो. म्हणून दिल्लीमध्ये या दोन्ही गटांमध्ये समाजावण्यासाठी एक बैठक उच्च पातळीवर झाली आणि त्यात त्यांना समज देण्यात आली. दोन गट एकत्र येऊ शकले नाहीत आणि त्याचा परिणाम चंद्रपूरच्या राजकारणावर झाला.
मूळ प्रश्नावरचे लक्ष उडवायचे हे भाजपचे धोरण
रेल्वे स्थानकाबाहेरील अवैध बांगलादेशींच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजप सरकारमध्ये आतापर्यंत सहा रेल्वेमंत्री होऊन गेले. तेव्हा रेल्वे फलाटावरील, बाहेरच्या बांगलादेशींना काढण्यासाठी सरकारने काय केले? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे किमान तीन वेळा मुख्यमंत्री झाले, त्याच्यापेक्षा जास्त काळ ते गृहमंत्री झाले. मग राज्याच्या गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी हे बांगलादेशी काढण्यासाठी काय कार्यवाही केली? निवडणुका आल्या की बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न निर्माण होतो. मुंबईमध्ये महापौरांनी बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न हातात घेतला. हे त्यांचे काम नाही, ते गृहखात्याचे काम आहे. पण असे प्रश्न निर्माण करून मूळ प्रश्नावरचे लक्ष उडवायचे हे साधारण भाजपचे धोरण आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
Comments are closed.