“सरकार मोदी की, सिस्टीम राहुल गांधी की”, जातनिहाय जनगणनेवरून संजय राऊत यांचा टोला

केंद्रातील मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे स्वागत करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांचे अभिनंदन केले. राहुल गांधी यांनी सातत्याने हा विषय उचलून धरला. त्यांच्या भूमिकेसमोर सरकारला गुडघे टेकावेच लागले, असा टोलाही राऊत यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना लगावला.

केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असला तरी, देशातील जनता, बहुजन समाज, दलित-शोषित-पीडित याचे श्रेय फक्त राहुल गांधी यांना देत आहे. सरकार मोदींचे आणि सिस्टीम राहुल गांधी यांची चाललीय. राहुल गांधी यांना जातनिहाय जनगणनेचा विषय सातत्याने उचलून धरल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला. आणि मुहूर्त कोणता निवडला बघा. पहलगाम हल्ल्यानंतर सरकारला जे प्रश्न विचारले जाताहेत, त्यावरचे समाजाचे लक्ष थोडेसे बाजुला व्हावे म्हणून अगदी देश युद्धाच्या छायेत असतानाही हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, असेही राऊत म्हणाले.

बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत. या सगळ्यांचा विचार करता राहुल गांधी यांना घेतलेल्या भूमिकेपुढे सरकारला शेवटी गुडघे टेकावेच लागले. त्यांच्यामुळे हे प्रकरण समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय म्हणतात त्याच्यावर सरकार निर्णय घेत नाही. त्यांनी पहलगाम येथे 27 लोक मारले गेले त्या सदर्भात बोलावे. कारण श्रेय ज्यांना द्यायचे त्याला द्यावे लागेल आणि अपयश ज्याच्या पदरात टाकायचे ते टाकावेच लागेल. यालाच स्वच्छ राजकारण म्हणतात, असेही राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, जातनिहाय जनगणनेचा विषय राहुल गांधी यांनी उचलला. तो पर्यंत या देशातल्या बहुसंख्य जनतेला त्या विषयी माहितीही नव्हते. आधी लोक म्हणायचे, हा काय प्रश्न आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते अनुराग ठाकूर यांचे संसदेतील भाषण आहे. ज्याच्या जातीचा पत्ता नाही, तो जातनिहाय जनगणनेची मागणी करतोय, असे घाणेरडे उद्गार त्यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल काढले होते. त्यामुळे या जातनिहाय जनगणनेला विरोध कुणाचा होता, तर भाजपचाच होता. पण आता कॅबिनेटने निर्णय घेतला असून आम्ही त्याचे स्वागत करतो आणि राहुल गांधी यांचे अभिनंदन करतो, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

देशभरात जातनिहाय जनगणना होणार! आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवा – राहुल गांधी

Comments are closed.