कृपाशंकर सिंहांचं विधान अनावधानानं नसून भाजपचं कारस्थान, त्यांना मुंबईत मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाय! – संजय राऊत

भाजपचा मराठीद्वेष्टा अजेंडा उघडा पडला असून मुंबईत उत्तर भारतीय महापौर व्हायला हवा, असे वक्तव्य भाजपचे नेते व माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. कृपाशंकर सिंहांचं विधान अनावधानानं नसून भाजपचं कारस्थान, त्यांना मुंबईत मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केली.

संजय राऊत म्हणाले, भाजपचं ठरलंय की मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही. हा भाजपचा अजेंडा आहे. वातावरण निर्माण करण्यासाठी भाजपने कृपाशंकर सिंह यांची नेमणूक केली. कृपाशंकर सिंह भाजपचा बोलका पोपट आहे. भाजपचे कारस्थान असून ते आधी वातावरण निर्मिती करतात, चाचपडून पाहतात. त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे. त्यांनी ठरवले आहे की मुंबईमध्ये मराठी माणूस संपवायचा. कृपाशंकर सिंह यांचे वक्तव्य अनावधानाने केलेले नसून ही भाजपची रणनीती आहे. वातावरण निर्मिती करायची, माहौल निर्माण करायचा, परप्रांतियांना जागे करायचे शिवसेना किंवा मनसे किंवा मराठी माणसाविरुद्ध मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचे.

भाजप महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भात काम करणारा पक्षच नाही. ज्या पक्षाचा संयुक्त महाराष्ट्र लढ्यात कधी सहभाग नव्हता, बेळगाव कारवारच्या सीमाप्रश्नाच्या संघर्षात त्यांचा सहभाग नव्हता तो पक्ष महाराष्ट्राच्या बाजुने किंवा मराठी माणसाच्या बाजुने उभा राहिल याची कल्पनाच कुणी करू नये. हा एकमेव पक्ष आहे ज्यांचा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या लढ्यात सहभाग नव्हता. शिवसेना होती, काँग्रेसचे नेते होते. चिंतामणी देशमुख यांनी राजीनामा दिला होता. शरद पवार या लढ्यात होते. कम्युनिस्ट पक्ष होते. मुस्लिम समाजाचे नेते होते. शाहीर अमर शेख यांनी अख्खा महाराष्ट्र गाजवून सोडला होता. भाजप कुठेच नव्हता. त्यामुळे कृपाशंकर सिंह यांच्या माध्यमातून मुंबईत मराठी महापौर कसा होणार नाही यासाठी त्यांची कारस्थाने सुरू झालेले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, पान खाऊन मराठी माणसाच्या तोंडावर पिचकारी मारण्याचे कालचे कृत्य असून त्यासाठी कृपाशंकर सिंह यांचे थोबाड निवडले. काहीही करून मराठी माणसाने या मुंबईचे नेतृत्व महापालिकेत करू नये हा त्यांचा अजेंडा आहे. त्यासाठी त्यांचे काम सुरू आहे. मराठी माणूस ठामपणे शिवसेना, मनसेच्या पाठीशी उभा राहतोय. आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आहे. अशावेळी अमराठी, परप्रांतियांची मतं आम्हाला मिळावी यासाठी मुंबईचा महापौर अमराठी करू असा त्यांनी एक अजेंडा समोर आणला.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच… कृपाशंकर सिंह यांची दर्पोक्ती; भाजपचा महाराष्ट्रद्वेष्टा अजेंडा उघडा पडला

मुंबईमध्ये गुजराथी समाजाविरुद्ध मराठी माणसाची लढाई कधीच नव्हती. मोदी, शहांचे राज्य आल्यापासून त्यांनी हा रंग दिला. गुजरातचा शासकच मराठी होता. बडोद्याचे महाराज गायकवाड संपूर्ण गुजरातचे शासक होते. ज्या गुजरातवर मराठ्यांचे साम्राज्य होते त्या गुजरातशी भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही. मोरारजी देसाई यांनी मुंबईत मराठी माणसावर आणि गुजरातवर गुजराती माणसावर गोळ्या चालवलेल्या आहेत. हा इतिहास आहे. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी सांगितले आहे गुजराती समाजाला की, तुमची लक्ष्मी आणि आमची सरस्वती एकत्र आली तर आपण देशावर राज्य करू. पण यांना फक्त काळ्या पैशाच्या लक्ष्मीचेच राज्य आणायचे आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

Comments are closed.