बाह्य शक्तींकडून गोपनीय माहिती माध्यमांना दिली जाते, त्याचा अर्थ सरकारच्या निशाण्यावर स्वकीय आहेत – संजय राऊत

AI व्युत्पन्न फोटो

बारामती पोटनिवडणुकीबाबात सुनेत्रा पवारांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे, उद्धव ठाकरे यावर लवकर भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच बाह्य शक्तींकडून गोपनीय माहिती माध्यमांना दिली जाते त्याचा अर्थ सरकारच्या निशाण्यावर स्वकीय आहेत असे सूचक विधानही त्यांनी केले.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवार गटाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी पक्षप्रमुखांशी त्यांनी चर्चा केली आणि त्या संदर्भात काय निर्णय झाला त्याबाबत स्वतः पक्षप्रमुख पत्रकार परिषद संवाद साधतील. बारामती पोटनिवडणुकीबाबात काँग्रेसने चार ते पाच उमेदवारांची मुलाखत घेतली आहे. उमेदवार ठरवण्याबाबत त्यांच्या पक्षात हालचाली सुरू आहेत. उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेतील हे सुद्धा आपल्याला कळेल. अजित दादा पवार हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे जवळचे आणि निकटचे सहकारी होते, असं उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यावर आपल्याशी बोलतील. सुनेत्राताई पवारांचा पक्ष महाविकास आघाडीत नाही. तो पक्ष भारतीय जनता पक्षाचा सहकारी पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस वेगळा निर्णय घेणार असेल तर त्यात महाविकास आघाडी म्हणून आम्ही लक्ष घातलं पाहिजे. पण उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचं भावनिक नातं होतं, त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील हे स्वतः सांगतील.

संजय राऊत म्हणाले की, या पोटनिवडणुकींबाबत काँग्रेस पक्ष उद्धवजी ठाकरेंची चर्चा करणार आहे. हे सगळे निर्णय शेवटी आघाडी म्हणून एकत्र चर्चा झाल्यावरच एकमेकांशी बोलल्यावरच त्यातून निकाल बाहेर येईल. अद्याप त्याच्यामध्ये प्रकरण पुढे गेलं अस मला वाटत नाही. काँग्रेस पक्ष हा या राज्यातला, देशातला एक महत्त्वाचा पक्ष आहे, भारतीय जनता पक्षाबरोबर असलेल्या पक्षाला मदत होऊ नये काँग्रेसची भूमिका असू शकते पण आम्ही चर्चा करू. तुमच्या माहितीसाठी सांगतो की पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मणराव जगताप यांच्या निधनानंतर तिकडे जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाने नाना काटे यांना उमेदवारी दिली होती. भारतीय जनता पक्षाने वारंवार अशा निवडणुका लढलेल्या आहेत. भावना फक्त शिवसेनेलाच असतात . अश्विनी जगताप यांच्या विरुद्ध अजित पवार यांनी एक तगडा उमेदवार नाना काटे यांच्या सारखा दिला होता आणि त्यांनी तिथे चांगली लढत दिली होती.
शेवटी असं आहे की ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष विरुद्ध इतर पक्ष अशीच निवडणूक होणार आहे. सुनेत्राताई पवारांनी माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. आता त्यांनी काँग्रेसशी चर्चा केली आहे काय याविषयी माझ्याकडे माहिती नाही असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

पवार कुटुंबीयांकडे बारामतीचं पद आम्ही तर देत नाही आहोत. भाजप बरोबर जाण्याचा निर्णय अजित पवारांचाच होता आणि आताही भाजप बरोबर राहून निवडणूक लढण्याचा निर्णय सुनेत्राताई पवारांचाच आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबाला भारतीय जनता पक्ष किंवा अन्य कोणाची गरज पडत नाही आणि यावेळेला ती पडणारच नाही असे संजय राऊत म्हणाले.

अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत पण त्या रॉच्या प्रमुख नाही. त्या रॉ च्या प्रमुख आहेत का किंवा महाराष्ट्राच इंटेलिजन्स डिपार्टमेंट त्याच्या प्रमुख आहेत का? नाही. म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. इतकी गुप्त माहिती कोणी व्यक्तिगत माणूस देऊ शकत नाही. आता त्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे किंवा भाजपचे संबंध आहेतच. हे तुम्ही अमान्य करू शकत नाही. पण तरी ती माहिती त्यांच्या माध्यमातून जर सरकार बाहेर काढत असेल तर याचा अर्थ सरकारच्या टार्गेटवर कोणीतरी आहे.म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेटवर त्यांनी एक निशाणा धरलेला आहे. तो निशाणा का वगैरे ते तुम्हाला कळेल. जेव्हा बाह्य शक्तींकडून धक्कादायक माहिती बाहेर काढली जाते तेव्हा स्वकीय जास्त टार्गेटवरती असतात. जेव्हा बाह्य शक्तींकडून शासकीय, गोपनीय माहिती प्रसिद्ध माध्यमांना दिली जाते त्याचा अर्थ सरकारच्या निशाण्यावर स्वकीय आहेत असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांनी शिंदे गटाच्या मंत्र्यानी आयोजित स्नेहभोजनाला उपस्थिती लावली, यावर संजय राऊत म्हणाले की, दिल्लीमध्ये अशा प्रकारच्या घडामोडी एकमेकांकडे जाणं येणं या अधिवेशनाच्या काळामध्ये होत असतं. माननीय उद्धव ठाकरे हे दिल्लीला येणार होते आणि त्यांच्या सन्मानार्थ महाविकास आघाडीतल्या खासदारांसाठी आम्ही जेवण ठेवणार होतो. त्याला आम्ही डिनर डिप्लोमसी म्हणत नाही. दिल्लीमध्ये एक गेट टुगेदर असतं सगळ्यांच. आता तुम्ही त्याला डिनर डिप्लोमेसी किंवा ऑपरेशन टायगरसाठी जेवण ठेवलं म्हणणं चुकीचं आहे. प्रत्येक केंद्रातला मंत्री या काळामध्ये अशा प्रकारे आपल्या बंगल्याच्या हिरवळीवर जेवण ठेवत असतो. केंद्रीय मंत्री देशाचे असतात ते सगळ्यांसाठी जेवण ठेवतात. केंद्रीय मंत्री जो असतो हा सगळ्यांना बोलवतो. त्याला असा भेदाभेद करता येत नाही. ते शासकीय जेवण असतं आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून कुठल्याही शासकीय पदावर नाही असेही संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले.

Comments are closed.