तुमची निष्ठा तिकिटावर की पैशावर? त्यांना लगेच दुसऱ्या पक्षात तिकीट कसं मिळतं? – संजय राऊत
महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. तिकीट न मिळाल्याने अनेकांनी गोंधळ घालत आक्रोश केला. तर काहींनी पक्षांतर करून तिकीटही मिळवले. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. तुमची निष्ठा तिकिटावर की पैशावर? त्यांना लगेच दुसऱ्या पक्षात तिकीट कसे मिळते? असा सवाल संजय राऊत यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केला.
बंडखोरांबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, बंड वगैरे काही नसते. या पक्षात तिकीट दिले नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट घ्यायचे हे बंड झाले का? बंड एकच झाले या देशात. 1857 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध झालेले बंड होते. तिकिटांसाठी बंड होतात म्हणजे तुमची निष्ठा तिकिटावर आहे की पक्षावर आहे, असे बाळासाहेब देखील नेहमी सांगायचे. ज्यांची तिकिटावर निष्ठा ते निघून गेले. तिकीट नाकारल्या नंतर दुसऱ्या मिनिटात जर एखादा उमेदवार दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी घेतो याचा अर्थ तो गेल्या 10 दिवसांपासून त्या पक्षाच्या संपर्कात आहे. मला इथे तिकीट मिळाले नाही तर मी ताबडतोब तुमच्याकडे येतो. याला निष्ठावंत किंवा बंडखोर कसे म्हणणार तुम्ही? यांना बेईमान म्हटले पाहिजे. त्यातले काही लोक दोन- तीन वेळा नगरसेवक झालेले आहेत. इतर कुणाला, तरुणांना, नवीन लोकांना संधी द्यायची नाही का? पक्षात लोक वर्षानुवर्ष काम करतात. काही लोकांना आम्ही देऊ शकत नाही. पण काही ठिकाणी संधी असेल, तर ती द्यायला पाहिजे आणि अशा प्रकारे शिवसेना पक्षप्रमुखांनी अनेक विभागात नवीन लोकांना संधी दिली.
संजय राऊत पुढे म्हणाले, प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा जास्त इच्छुक असतात. कुठे 10-15 तर कुठे 16… या सर्वांचे समर्थक आणि पाठीराखे असतात. त्याशिवाय कुणी उमेदवारी अर्ज मागत नाहीत. शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख, इतर सामाजिक कार्यकर्ते .. प्रत्येकाला आता समाज माध्यमांच्या माध्यमातून समर्थक मिळतात आणि मग ते राजीनाम्याचे नाट्य करत असतात. हे अशा प्रकारे पहिल्यांदाच घडले नाही. आम्ही गेल्या 60 वर्षापासून निवडणुका लढवतो. तेव्हापासून हे चित्र सर्वत्र पहायला मिळते. पण अनेक जण अर्ज मागे घेतील.
मुंबईमध्ये शिवसेना-मनसेची युती भक्कम आहे. मराठी माणूस यावेळी स्वत:ला बंडखोर म्हणवून घेणाऱ्या प्रवृत्तीला पाठीशी घालणार नाही. जर कुणी गेले असतील तर ते महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत. तुम्हाला दीर्घकाळ ही पदं दिलेली आहेत. कुठेतरी पक्षाला असे वाटले की बदल करायला पाहिजे, तर तुम्ही पक्षाबरोबर राहायला पाहिजे. काही वॉर्डामध्ये विजयासाठी बदल आवश्यक असतो. तो करण्याचा अधिकार पक्षाच्या प्रमुखांना असतो आणि त्यानुसार ते केले आहेत, असे राऊत स्पष्ट म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ज्यांना उमेदवारी द्यायची आहे, त्यांना एबी फॉर्म दिला जातो. उद्या छाननी झाल्यावर तुम्हाला कळेलच कुणाला फॉर्म दिले. उमेदवारी दिली हे लपून राहत नाही. याद्या जाहीर करायच्या, मग त्या यादीतून गोंधळ व्हायचा हे प्रकार बहुतेक सर्वच पक्षांनी थांबवलेले आहेत. उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर जी यादी येते ती अंतिम असते. काल संध्याकाळपर्यंत शिवसेनेने ज्यांना एबी फॉर्म दिले, त्या सगळ्यांनी वाजत गाजत आपले अर्ज भरलेले आहे. मनसेच्या उमेदवारांनी सुद्धा उत्साहात अर्ज भरलेले आहेत. काही ठिकाणी शिवसेना, मनसे यांनी एकत्र जाऊन अर्ज भरले आहेत.
बाकी इतर पक्षात काय गोंधळ चालला आहे, हे आपण पाहिले असेल. 14 महानगरपालिकेत महायुती तुटलेली आहे. अनेक शहरात महायुतीतील लोक एकमेकांच्या छाताडावर बसलेले आहेत. शिस्तबद्ध भाजपच्या तिकीट वाटपात नाशिकपासून संभाजीनगरपर्यंत आणि ठाण्यापर्यंत काय गोंधळ झाला आणि लोकांनी, महिलांनी कसा आक्रोश केला हे सुद्धा चित्र पाहण्यासारखे होते. बाहेरून आलेल्या उमेदवारांना, गुंडांना उमेदवाऱ्या देण्याचे काम अजित पवारांपासून सर्वच पक्षांनी केले. ही लोकशाही आहे त्यांच्या पक्षात, असेही राऊत म्हणाले.
भाजप नेते म्हणतात आमच्याकडे रीघ लागली आहे. याचाही राऊत यांनी समाचार घेत त्यांच्याकडे गुंडांची रीघ लागलेली असून काल गजा मारणेच्या बायकोलाही अर्ज दिलाय, असा टोला राऊत यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, पुण्यात भाजपचे अनेक निष्ठावंत अजित पवारांच्या पक्षात, अन्य पक्षात गेले. संभाजीनगरातही निष्ठावंत म्हणून घेणारे भाजपचे शिस्तबद्ध कार्यकर्ते इतर पक्षात गेले. निष्ठावंत वगैरे काय नसते. आज शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट उमेदवारीबरोबर जे 5-10 कोटींचे आर्थिक पॅकेज देत आहेत त्यासाठी हा गोंधळ, रीघ आहे. निष्ठा पैशाच्या त्या पावसात वाहून गेल्या आहेत. आमच्याकडे शुद्ध कार्यकर्ते आहेत. शाखाप्रमुख असतील, त्यांच्या कुटुंबातील कार्यकर्ता असतील. जुने आमचे कार्यकर्ते आहेत. आम्ही त्यांना उमेदवारी दिली. सामान्य मराठी माणसं आमच्याकडून निवडणुका लढत आहेत, असे राऊत म्हणाले.
Comments are closed.