कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी एक कडक भूमिका घेणे गरजेचे, NCP च्या विलीनीकरणाच्या चर्चांवर संजय राऊत यांचे विधान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आहे. सकाळ-संध्याकाळ हाच विषय चर्चिला जात असून कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी एक कडक भूमिका घेणे गरजेचे आहे, असे ठाम मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

विलीनीकरणाबाबत ‘दै. सामना’मध्ये शनिवारी छापून आलेल्या ‘चला, विलीनीकरण – विलीनीकरण खेळू या!’ हा अग्रलेखाबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, विलीनीकरणाबाबत आम्ही एक परखड मत मांडले. आम्ही शरद पवारांवर प्रेम करतो. त्यांच्या पक्षाला आम्ही मार्गदर्शन करणारे कुणी नाही. पण जनतेच्या मनामध्ये काय भावना आहेत, त्या व्यक्त करणारा तो अग्रलेख आहे.

विलीनीकरणाचा खेळ आता थांबला पाहिजे. आपण सगळे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत आहोत. कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी एक कडक भूमिका घेणे गरजेचे आहे. बाकी अमित शहा यांचे पक्ष शिंदे गट किंवा अजित पवार गट हे वाऱ्यावरची वरात आहेत. शिंदे गट आणि अजित पवार गट पक्ष नाहीत, खरे पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार नाही ही ठाम भूमिका मी मांडत आलो आहे. विलीनीकरण कदापि शक्य नाही. भावनिक दृष्ट्‍या शक्य नाही, राजकीय दृष्ट्‍या शक्य नाही आणि नैतिक दृष्ट्‍याही शक्य नाही. तसेच कुणी कुणाचे नेतृत्व मान्य करायचे हा मुद्दाही आहे. शरद पवारांसारख्या टोलेजंग नेतृत्वाने कुणाचे नेतृत्व मान्य करायचे? तसेच ज्या पवारांनी आयुष्यभर फुले-शाहू-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचा विचार या महाराष्ट्रात पुढे नेला आणि रुजवायचा प्रयत्न केला, ते आणि त्यांचा पक्ष धर्मांध आणि देश तोडणाऱ्या पक्षाबरोबर जातील असे वाटत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

सुप्रिया सुळे वैतागल्या; कसले विलीनीकरण? या चर्चांचा मला अक्षरशः वीट आलाय!

Comments are closed.