ठाकरे बंधुंची युती ‘इंडिया’ आघाडीचा विषय नाही; मराठी भाषा, अस्मिता, महाराष्ट्राचं रक्षण हाच केंद्रबिंदु! – संजय राऊत
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती हा इंडिया आघाडीचा विषय नाही. हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे. इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुका, तर महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी निर्माण झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अशी कोणती आघाडी अजून निर्माण झालेली नाही. मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान, महाराष्ट्राचे रक्षण यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले असून याबाबत निर्णय घेण्यास ठाकरे बंधू सक्षम असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत शनिवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
शिवसेना-मनसे युतीबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती हा इंडिया आघाडीचा विषय नाही. हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती राष्ट्रीय स्तरावर कधीच चर्चा होत नाही. काही लोक दिल्लीत त्यांचे पक्षप्रमुख बसतात म्हणून तिकडे जात असतील आणि चर्चा करत असतील. पण एकत्र येण्याचा निर्णय ठाकरे बंधूंनी घेतलेला असून ते समर्थ आहेत.
ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीमध्ये कुणालाही आक्षेप नाही. कुणालाही आक्षेप असण्याचे कारणही नाही. मराठी प्रश्नावर दोन बंधू एकत्र येत असतील तर आक्षेप काय आहे? मराठीच्या प्रश्नावर हर्षवर्धन सपकाळ तीच भूमिका घेऊन उभे आहे. आम्ही राजकीय दृष्ट्या एकत्र आलो आहोत त्याचा केंद्रबिंदूच मराठी, मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान, मराठी माणूस, महाराष्ट्राचे रक्षण हाच आहे. शरद पवार असतील किंवा राज्याचे काँग्रेसचे प्रमुख हर्षवर्धन सपकाळ असतील या सगळ्यांच्या भूमिका मराठी भाषा, अस्मिता आणि मराठीवर होणारी इतर भाषांची सक्ती या संदर्भात समान आहे, असेही राऊत म्हणाले. तसेच मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काही एकत्र भूमिका घेण्याचे ठरवले असेल तर संपूर्ण देशातील मराठीप्रेमी स्वाभिमानी जनतेला त्याचा आनंदच होईल, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आम्ही सगळ्यांची चर्चा करतो. महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अशी कोणती आघाडी निर्माण झालेली नाही. प्रत्येक महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यात राजकीय पक्ष अनेकदा नसतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार त्या-त्या शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना असतात. मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्याने याबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत.
एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांनी परप्रांतियांच्या विरोधात कोणतीही भूमिका घेतलेली नाही. कधीकाळी शिवसेनेवर हे आरोप होत होते. महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी बोलता आले पाहिजे. अशाच प्रकारचे आंदोलन सध्या बंगालमध्ये सुरू आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी ‘भाषा आंदोलन’ सुरू केले आहे. तामिळनाडूमध्ये, दक्षिणेतही हेच आंदोलन सुरू आहे. मराठी बोलणार नाही असे जेव्हा सांगितले जाते महाराष्ट्रात तेव्हा त्यांच्याविरुद्ध लोकांचा रागाचा भडका उडतो आणि तो स्वाभाविक आहे.
कोणत्याही संघर्षाची तयारी
नारळी पोर्णिमेला वरळी कोळीवाड्यात आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने आले होते. त्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, आमची कोणत्याही संघर्षाची तयारी आहे. जर तुम्ही पाळलेल्या निवडणूक आयोगाशी आम्ही संघर्ष करतोय, तर हे संघर्ष रस्त्यावरचे संघर्ष शिवसेनेच्या पाचवीला पुजलेले आहेत. वरळी कोळीवाड्यात आदित्य ठाकरे असताना राज्याचे उपमुख्यमंत्री, पोलिसांचा फौजफाटा जाऊन दादागिरी करत असतील तर ती दादागिरी मोडून काढू. फार दादागिरी करू नका, तुमची दादागिरी फडणवीस रोज मोडून काढत आहेत, असेही राऊत म्हणाले.
Comments are closed.