उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाची एकजूट दिसली, त्यांना फक्त 10 मतं इकडे तिकडे करता आली! – संजय राऊत

एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झाले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आमचे उमदेवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणूक लढली. या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाची एकजूट दिसली, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केले.

संजय राऊत म्हणाले की, जगदीप धनखड यांना 75 टक्के मतं मिळाली होती आणि आता राधाकृष्णन यांना मिळालेल्या मतांमध्ये प्रचंड तफावत आहे. आमच्या उमेदवाराला 300 मतं मिळाली. आमची साधारण 314 ची ताकद होती. 15 मतं अवैध ठरवली आणि ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती. पण शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी कुणाचे असतात हे आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्रातील विधानसभा, लोकसभा निवडणुकीत जसे झाले तसे तिकडे होऊ शकते.

क्रॉस वोटिंगच्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, ज्याच्या हातात सत्ता आहे, प्रचंड ताकद आहे, पैसा आहे त्यांना फक्त 10 मतं इकडे तिकडे करता आली. 10 मतं कोणती असावीत याचा साधारण आम्हाला अंदाज होता. आम्ही नाराज नाही, निराश नाही. आम्ही लढलो. संसदेत विरोधी पक्षाचा 300 हा आकडा लहान नाही. एरवी बीजू जनता दल, अकाली दल, केसीआर यांचा पक्ष एनडीएच्या बाजुने उभे राहतात. पण या निवडणुकीत ते तटस्थ राहिले. त्यांनी आम्हाला मतदान करण्याचा विचार केला होता, पण शेवटी भय, दहशत, सत्तेचा गैरवापर झाला. तरी निवडणूक उत्तम झाली.

नवीन उपराष्ट्रपतींवर आम्ही पूर्व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा शोध घेण्याची जबाबदारी देणार आहोत. राज्यसभा सुरू झाल्यावर आम्ही हा मुद्दा उपस्थित करू. ते हरयाणातील एका फार्म हाऊस असल्याचे म्हटले जाते, पण जोपर्यंत त्यांचे सार्वजनिक दर्शन होत नाही आणि इतके दिवस त्यांना कुठे डांबून ठेवले हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत ते गायब आहेत असेच आम्ही गृहित धरतो. संविधानाचे रक्षण करण्यासाठी नवीन उपराष्ट्रपती आले असतील तर पूर्व उपराष्ट्रपतींचे काय झाले याची माहिती राज्यसभेला देण्याची जबाबदारी त्यांची आहे, असेही राऊत म्हणाले.

राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती

काही मतांच्या बाबतीत संशय होता. हा संशय देशभरातली असून एका राज्यातील नाही. देश एवढा मोठा आहे, एवढे खासदार आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाची माहिती असते, असे म्हणत शिवसेना, राष्ट्रवादीची मतं फुटले म्हणणाऱ्या मिंधे गटाच्या नेत्यांनाही संजय राऊत यांनी फटकारले. असे विधान करणाऱ्यांचा मेंदू गुडघ्यात सुद्धा नाही. त्यांना मेंदूच नाही. हे कोण लागून गेले आमची मतं फोडणारे? उलट असे विधान करून तुम्ही निष्ठावंतांचा अपमान करताय. निष्ठा शब्दाचा अपमान करणारे आणि त्याला कलंक लावणारे हे लोक आहेत. स्वत: विकले गेले, शरण गेले, स्वाभिमान गहाण पडलाय, गुलामी पत्करली आणि इतरांवर शिंतोडे उडवताहेत. शहापणा शिकवू नका, नेपाळमध्ये जे झाले ते महाराष्ट्रात तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला.

Comments are closed.