…तर संघामध्ये मोदी, शहा आणि योगी यांच्या संदर्भात गांभीर्याने विचारमंथन सुरू आहे- संजय राऊत
आमच्या रक्तात एकता आहे, राष्ट्रीय एकात्मता आहे. भाजपच्या रक्तात हे गुण आहेत का? हे राष्ट्र एक राहिलं पाहिजे, आम्ही तिरंग्यावर प्रेम करतो तितकंच भगव्यावरही करतो. आम्ही जात आणि धर्मापलीकडे हा देश उभा करण्याचा प्रयत्न करतो. असे विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच भाजपचे नेते आणि कार्यकर्ते हे करतात का? भागवतांनी परदेशात हे प्रवचन दिलं आहे ते उत्तम आहे. पण ते त्यांनी दिल्ली किंवा नागपुरात ही भूमिका मांडावी. ही बाब त्यांनी मोदींना, अमित शहांना, योगी आणि सांगायला हवी. फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळात या विषयावर बोलणारे छछोर लोकं आहेत त्यांना सांगायला पाहिजे. याचा अर्थ स्पष्ट आहे, जर सरसंघचालकांनी राष्ट्रीय एकात्मता आणि त्यातली विविधता, सर्वधर्मसमभाव विचार मांडला असेल तो खरोखर पक्का असेल तर याचा अर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये मोदी, शहा आणि योगी यांच्या संदर्भात गांभीर्याने विचारमंथन सुरू आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
खरगे यांनी आंदोलन केलेल्या जागेच्या शुद्धकरण्याच्या घटनेसंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘राहुल गांधी यांनी काहीही चुकीचं म्हटलेलं नाही. खरगे यांनी जिथे आंदोलन केलं तिथली जागा शुद्ध केली गेली. हा जायीतवाद आहे. सरसंघचालक अमेरिकेत जाऊन राष्ट्रीय एकात्मतेची भाषा करतात. आणि इथे हलद्वानीमध्ये त्यांचे चेले एक नेत्याचा कार्यक्रम झाल्यानंतर शुद्धीकरण करतात. हा खोटेपणा आहे, हे ढोंग आहे. जर सरसंघचालक जर खरे असतील तर या शुद्धीकरणाप्रकरणी स्पष्टीकरण दिले पाहिजे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपने आरक्षणावर जातीय राजकारण बंद केले पाहिजे!
मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या समाजाचे नेतृत्व करत आहेत. प्राण पणाला लावून लढत आहेत. सतत उपोषण करून त्यांची प्रकृती खालावली आहे, हे मी स्वतः पाहिलं आहे. मध्यतंरी मी त्यांना भेटायला गेलो होते. तेव्हाही मी सांगितलं की सतत उपोषण करू नका. जरांगेंची प्रकृती किती खालावली आहे त्यांनी मला दाखवलं. अशा वेळेला मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असताना, वातावरण तप्त असताना परभणीचे जे खासदार आहेत, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जो मेळावा घेतला तो टाळावा अशी जरांगे पाटील यांची भूमिका होती. समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांची ती भूमिका होती. जरांगेंची ती तळमळ आणि तडफड मी काल पाहिली. संजय बंडू जाधव यांना निवडून आणण्यासाठी त्यावेळी जरांगे पाटलांची फार मोठी मदत झाली हे सत्य आहे. त्यामुळे जर जरांगे पाटील यांनी अपेक्षा केली असेल की हा त्याग बंडू जाधव यांनी करावा, तर तो त्यांनी करायला पाहिजे होता. पण जे बंडू जाधव जे आहेत ते इतकी वर्ष ठाकरेंकडे सत्ता भोगूनही ठाकरे यांचे होऊ शकले नाहीत, ते आमच्या मनोज जरांगे पाटील यांचे कसे होतील? अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बंडू जाधव आणि शिंदे गटावर टीका केली.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तरे देताना संजय राऊत म्हणाले की, ‘मी वारंवार सांगतोय की उपोषण हे नेत्याच्या प्रकृतीला अत्यंत त्रासदायक असतं, हे आम्ही जंतर मंतरलाही आम्ही पाहिलं. मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीतही पाहिलं. त्यामुळे सगळ्यांनी ही बाब संयमाने घेतली पाहिजे’.
खासदार संजय बंडू जाधव यांची सर्वात मोठी चूक किंवा अपराध कुठला असेल तर ती म्हणजे त्यांनी ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. मी आधीच म्हणालो की जे ठाकरे यांचे झाले नाही, आमदारकी, खासदारकी भोगून, प्रतिष्ठा मान सन्मान मिळवून ज्यांनी गद्दारी केली, त्यांच्याकडून जरांगे पाटील यांनी काय अपेक्षा करावी? जरांगे पाटील यांनी धडा शिकवण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि मला त्यांचा स्वभाव माहित आहे. ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. धडा आम्हीही शिकवू, जे गद्दार गेले आहेत तिकडे सगळे हे परत संसदेत जाणार नाहीत याची व्यवस्था शिवसैनिकांनी केलेली आहे, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला.
आरक्षणाच्या संदर्भात सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेवर जरांगे पाटील यांनी आपली फसवणूक होत असल्याचे मत मांडली आहे. त्यासंदर्भात बोलताना ‘आपली फसवणूक होत आहे असं जरांगे पाटील यांना वाटतंय. या संदर्भात त्यांच्याशी तज्ज्ञसमितीकडून सविस्तर चर्चा होणं हाच एक मार्ग आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे या सगळ्या विषयावर कुंपणावर बसून आहेत. ते नागपुरात बसून स्टेटमेंट देतात. आतापर्यंत त्यांनी कुठल्या विषयावर मार्ग काढला आहे हे त्यांनी सांगावं. उपमुख्यमंत्री मिंधेही म्हणतात की चर्चा करू, मार्ग काढू. किती मार्ग काढले आणि किती चर्चा केल्या? ज्युनियर मंत्री तुम्ही चर्चेसाठी पाठवता किंवा मुंबईतला एखादा आमदार पाठवता हा विषय इतका लहान आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित करत मिंधे गटावर टीका केली.
‘तुम्ही गांभीर्याने या विषयावर चर्चा केली पाहिजे. या महाराष्ट्रातले जे समाजघटक आहेत त्यांच्याकडे तुम्ही त्यांच्या समस्यांकडे, त्यांनी मांडत असलेल्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाहीत, तुम्ही वरवरची उत्तरं देता. बाकी सगळ्या गोष्टींसाठी तुमच्याकडे वेळ आणि गांभीर्य आहे. पण जेव्हा एक समाज प्रश्न घेऊन उभा राहतो त्या समाजासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ काढावा लागेल. पहिल्या कॅबिनेच्या बैठकीत ते धनगर समाजाला आरक्षण देणार होते. महादेव जानकर उपोषणाला बसले होते. फडणवीस हे विसरलेले दिसताहेत. त्यांचा हा शब्द आहे. मराठा समाजाच्या बाबतीत तेच शब्द होते. पण महाराष्ट्रातल्या एकाही समाजाला ते न्याय देऊ शकले नाहीत. ते प्रत्येक समाजाला एकमेकांविरोधात खेळवतात, वाद निर्माण करतात. ते वाद निवडणुकीपर्यंत चालवतातच. परत आश्वासन देतात, निवडणूक जिंकतात आणि परत पाच वर्षांनी ते चक्र सुरू राहतं, अशा शब्दात यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपने आरक्षणावर जातीय राजकारण बंद केले पाहिजे. या आधी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. वसंतराव नाईक आणि शरद पवार होते, वसंतदादा पाटील असे अनेक मोठे नेते या राज्यात झाले. त्यावेळी असे प्रश्न का निर्माण झाले नाहीत? या आगी लावण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय स्तरावर मोदी आणि शहांनी केले आहे. त्यामुळे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रासारखं राज्य परिणाम भोगतोय. यांना फक्त श्रेय घ्यायचे आहे, या महाराष्ट्रातले विघटन करणारे प्रमुख विषय आहेत त्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असं का वाटत नाही की या राज्यातले पाच प्रमुख जाणते नेते त्यांना एका बैठकीला बोलावून या विषयावर चर्चा करून एखादा निर्णय का घेऊ नये? मग त्यात काँग्रेसचे नेते, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असतील, डाव्या पक्षांचे नेते असतील. तुमचं मन या प्रश्नाला मान्यता का देत नाही? जे प्रमुख पक्ष राज्याच्या निर्णयप्रक्रियेत आहेत अशा पक्षांना बोलवा. या सगळ्यांना एकत्र बसवून या राज्यातल्या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्याची सुबुद्धी जोपर्यंत या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना येत नाहीत तोवर त्यांना मी महाराष्ट्राचा नेता मानायला तयार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
मागच्यावेळीही मनोज जरांगे पाटील मुंबईत आले आणि त्यांची फसवणूक झाली असं माझं म्हणणं आहे. या वेळी जर मनोज जरांगे पाटील येणार असतील तर त्या संदर्भात जरांगेंशी चर्चा करण्याची आणि मार्ग काढण्याची तयारी ठेवली पाहिजे. सरकार पुन्हा एकदा जरांगे पाटील यांना खोटी आश्वासनं देऊन कसं गुंडाळता येईल याच्या बैठका काल रात्रीपासून सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावेळी हे करू नये. एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांचा आतापर्यंत गैरफायदा घेतलेला आहे, अशी माझी माहिती आहे. म्हणूनच जरांगे पाटील काल चिडले. त्यांचा संताप आणि चीड ही त्या फसवणुकीतून निर्माण झालेली आहे, असेही ते म्हणाले.
SIR च्या माध्यमातून त्यांना हवे ते मतदार ठेवायचे!
SIR प्रक्रियेसंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, नवी मुंबईतल्या खारघरमध्ये SIR चे डुप्लिकेट फॉर्म बनवून भाजपच्या कार्यालयात कोणत्या प्रकारची कृत्य सुरू होती हे आपण पाहिलं. SIR च्या माध्यमातून त्यांना हवे ते मतदार ठेवायचे आणि जे मतदार त्यांच्या विरोधात मतदान करू शकतात असे समाजातले लोकं वगळायचे हा भाजपचा अजेंडा आहे. म्हणूनच SIR च्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. भाजप हा निवडणुका जिंकण्यासाठी नवनवीन फंडे आणत आहे. कधी EVM मध्ये घोटाळे करतं, कधी पैश्यांचा वापर, कधी मतदार यादीचा घोटाळा. आता SIR आणलेला आहे.
Comments are closed.