महाराष्ट्रात तुम्ही बुलडोझर राज सुरू केले आहे का?, संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल
“शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आदिवासींची घरे आणि संसार उद्ध्वस्त केले जात असतील आणि ते खुद्द विधानसभा अध्यक्षच करत असतील, तर हे अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रात तुम्ही बुलडोझर राज सुरू केले आहे का?” असा संतप्त सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील आदिवासींच्या जमिनी लाटून त्यांची घरे पाडल्याच्या प्रकरणावरून संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
आदिवासींचे संसार उद्ध्वस्त करून जमिनी बळकावल्या
अलिबाग तालुक्यातील २० आदिवासी कुटुंबांच्या घरांखालील जमिनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विकत घेतल्याचा आरोप होत आहे. ती जमीन आदिवासींची असल्याचे कळल्यानंतर त्यांचा एजंट दशरथ पाटील याने तिथे जेसीबी नेऊन आदिवासींना हुसकावून लावले. त्यांची घरे जमीनदोस्त करून संसार मातीखाली गाडले आणि त्यांना दुसरीकडे नेऊन सोडले, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी आंदोलन करत आहेत; परंतु विधानसभा अध्यक्षांच्या दबावाखाली पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचे राऊत म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
गेल्या काही काळात नार्वेकर बंधूंनी अलिबागमध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यासाठी पैसा कुठून आला, याचा अभ्यास केल्यास संविधानिक पदावरील व्यक्तीने कसे वागावे याचे प्रशिक्षण द्यावे लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला. ज्या व्यक्तीवर असे गंभीर आरोप आहेत, ती व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षपदी बसली असेल, तर एखाद्या आमदाराने सभागृहात आवाज उठवला तरी त्याला न्याय मिळणार नाही. हे प्रकरण वेळेत थांबले नाही, तर याची व्याप्ती आणखी वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारच्या प्रतिष्ठेवर आणि ‘एसआयटी’वर टीका
“हे सरकार आणि यातील मंत्री केवळ पैसे खाण्यात व भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत. मंत्र्यांनी राज्याची प्रतिष्ठा घालवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत शे-पाचशे एसआयटी (SIT) स्थापन करत आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जरी राहुल नार्वेकर यांना संवधानिक पदावर बसवले असले तरी ते भाजपचे सदस्य आहेतच. महापालिका निवडणुकीत त्यांनी पदाचा गैरवापर करत दादागिरी केल्याचे आपण पाहिले आहे. शिवसेनेच्या बाबतीत त्यांनी दिलेला निकाल हा भ्रष्ट मानसिकतेचा पुरावा आहे. अशा व्यक्तीने संवधानिक पदावर बसणे देशासाठी धोकादायक आहे,” अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.
चोरांना, महाराष्ट्र लुटणाऱ्यांना वाचवू नका; मुख्यमंत्र्यांना आवाहन
“आदिवासींचा आक्रोश दडपला जात असेल, तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूषणावह नाही. २० आदिवासींची घरे पाडणे म्हणजे त्यांच्या हक्कांचा खून करण्यासारखे आहे. हे विधानसभा अध्यक्षांना कळत नसेल आणि मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालणार असतील, तर या राज्यातील माणुसकी दफन झाली आहे, असे मी मानतो,” अशा शब्दांत राऊत यांनी संताप व्यक्त केला. तसेच, “नार्वेकरांनी पत्नी आणि भावाच्या नावाने जमिनी घेण्याचा जो सपाटा लावला आहे, त्यामागचे प्रेरणास्थान गुजरात आहे. जिथे पाणी नाही, रस्ते नाहीत, तिथे जमिनींचे प्लॉटिंग सुरू आहे आणि सरपंचांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चोरांना आणि महाराष्ट्र लुटणाऱ्यांना वाचवू नये,” असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.
Comments are closed.