रोखठोक – अॅसिडचा पाऊस! एक दिवस ‘सूर्य’ही जळून जाईल!
इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात आतापर्यंत हजारो बॉम्ब पडले आहेत. त्यातून धुराचे, आगीचे लोळ निघाले. तेल विहिरी जाळण्यात आल्या. त्यातून तेहरानचे आकाश काळेकुट्ट झाले व अॅसिडचा पाऊस पडू लागला. हे विषारी काळे ढग भारताच्या आकाशात पोहोचतील अशी भीती आहे. बॉम्ब न पडताही आपले प्रचंड नुकसान त्यात होईल!
इराण, इस्रायल-अमेरिका युद्धात आतापर्यंत हजारो बॉम्ब पडले आहेत. इमारती, तेल रिफायनरी, तेल विहिरींना आगी लागल्या. या आगीच्या ज्वालांपासून बहुतेक देश आज तरी दूर आहेत. दुबई, कतार, बहरीन अशा आखाती राष्ट्रांवरही इराणने बॉम्ब वर्षाव करून त्या देशांचे आकाश काळ्या विषारी ढगांनी भरून टाकले आहे. ज्यांच्यापर्यंत युद्धाचे चटके पोहोचले नाहीत, त्यांच्यापर्यंत या बॉम्ब वर्षावाचे दुष्परिणाम, धोके पोहोचणार आहेत व त्यातून बदललेल्या हवामानामुळे येणाऱ्या पिढ्यांनाही त्रास सहन करावा लागेल, हे मात्र नक्की आहे.
जगभरातील पर्यावरणप्रेमी व हवामान शास्त्रज्ञांनी या जागतिक धोक्यावर आपले चिंतन सुरू केले आहे. त्यातून आलेले निष्कर्ष भयंकर आहेत. सात-आठ मार्चच्या रात्री इस्रायलने तेहरान आणि अल्बोर्झ प्रांतांतील चार मोठय़ा तेलसाठ्यांवर व प्रमुख तेल विहिरींवर, तेल वितरण केंद्रांवर बॉम्बहल्ले केले. त्यामुळे आगी लागल्या. शहरातून जाणाऱ्या तेलवाहक पाइपमधून तेल बाहेर पडू लागले. रस्ते काळ्या कच्च्या तेलाने वाहू लागले व जागोजागी आगी लागतील अशी भयंकर स्थिती निर्माण झाली. आकाश इतके काळे झाले की, त्या दिवशी उगवलेला सूर्य तेहरानकरांना दिसलाच नाही. हवेत मोठय़ा प्रमाणात विषारी हायड्रोकार्बन, सल्फर, नायट्रोजन ऑक्साईड मिसळले. शहरावरील प्रदूषणाने भरलेल्या आकाशातून पाऊस पडू लागला. त्याने ही रसायने शोषून घेतली आणि तेलकट, काळ्या पावसाच्या धारांतून ते खाली पडले. जणू आकाशातून अॅसिडचाच वर्षाव सुरू झाला. हे चित्र भयंकर होते.
भारताला खरा धोका
डॉ. अंजल प्रकाश भारतीय हे स्कूल आाफ बिजनेसमध्ये क्लिनिकल असोसिएट प्रोफेसर आहेत. संशोधन संचालक म्हणून ते काम पाहतात. “तेहरानवरील काळ्या विषारी ढगांपासून भारताचीही सुटका नाही. सावध रहा” असा इशारा त्यांनी दिला आहे. जगातील काही भागांत लवकरच अॅसिडचा पाऊस पडेल. इराणवरील संकटापासून आपल्याला पळ काढता येणार नाही हे या तज्ञांचे मत आहे. तेलयुक्त काळ्या ढगांचा भारताला नक्की काय धोका आहे? या प्रश्नावर प्रा. अंजल प्रकाश सांगतात, “याक्षणी हवेची दिशा इराणकडून पाकिस्तानच्या पश्चिमी क्षेत्रात (बलुचिस्तान) वाहत आहे. पाकिस्तानच्या पश्चिमी भागात सगळ्य़ात जास्त धोका आहे. या भागातील पीकपाण्यावर त्याचा 20 टक्के परिणाम होईल. पाकिस्तानकडून भारताच्या उत्तर-पश्चिम दिशेला वारे वाहतात. त्यामुळे भारतालाही या विषारी काळ्या ढगांचा फटका बसेल. हिमालय व इतर भागांतील पर्यावरण यामुळे बिघडेल. जर वरच्या पट्ट्यावरील तीव्र वारे (जेट स्ट्रीम) मजबूत राहिले तर हे काळे ढग गुजरात, राजस्थान व पंजाबपर्यंत पोहोचू शकतात. अफगाणिस्तानलाही तोच धोका आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तानला धोका जास्त आहे म्हणून भारताला गप्प बसून चालणार नाही. हवा, पाण्याच्या मार्गाने हे विष प्रत्येकाला संकटात टाकणार आहे. तेल जळत राहिल्यामुळे त्यातून निघणारे कण पाच ते दहा दिवसांत दोन हजार ते तीन हजार किलोमीटर दूरपर्यंत पसरू शकतात. या अॅसिड पावसाचा प्रभाव प्रदीर्घ काळ राहील. पुढील अनेक काळापर्यंत त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. अॅसिड पावसामुळे झाडे, वेली, वनस्पती कमजोर होतील. पाण्याची गुणवत्ता बिघडेल. मानवी आरोग्यासाठी हे विष आहे. घसा, श्वास यांसारखे आजार बळावू शकतात.
मानवजातीवर संकट
तेहरानमधील अॅसिड पाऊस आणि काळे ढग यापासून भारतीय जनतेला काय धोका आहे?
हवेतले प्रदूषण जे आधीच आहे, त्यात बॉम्ब वर्षावामुळे तसेच जळणाऱ्या तेलाने अधिक तीव्रता निर्माण केली आहे.
कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देणारी ही स्थिती आहे.
मुलांना आणि वृद्धांना यापासून सर्वात जास्त धोका आहे.
शेत जमिनींची सुपीकता व कस यावर परिणाम होईल.
न्यायालयांनी प्रदूषण टाळण्यासाठी फटाक्यांवर बंदी घातली. धूर होतो हे कारण दिले, पण आता तेहरानवरून येणारी काळी हवा, काळे ढग रोखणे हे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. ते काळ्याभिन्न अतिरेक्यांसारखे हवा आणि पाण्यातून येतील व मानवजातीवर अदृश्य हल्ला करतील.
दिल्लीच्या सीमेवर कचरा जाळल्याने धुराचे लोट येतात व प्रदूषण वाढते. मुंबईसारखी शहरे दूषित हवेशी लढत आहेत. मोटारींतून निघणारा काळा धूर माणसांची फुप्फुसे निस्तेज करीत आहे, पण अॅसिडचाही पाऊस पडेल हे कोणी स्वप्नातही पाहिले नव्हते. हिरोशिमा, नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले. त्याचे परिणाम जपानच्या पुढील अनेक पिढ्या भोगत आहेत. बॉम्ब वर्षाव युक्रेन-रशिया युद्धातही सुरूच आहे व युक्रेनमध्येही असेच प्रदूषण झाले. कोळसा, तेल जळाल्याने काळे विषारी ढग तेथेही निर्माण झाले. त्याचे परिणाम रशिया व युक्रेनची जनता भोगत आहे. युरोपातही विषारी ढग सरकताना दिसत आहेत. युक्रेन युद्धामुळे 2.3 ते 2.5 डिग्री सेल्सियस इतके तापमान वाढले. आता इराण युद्धाबरोबर पाकिस्तान, अफगाणिस्तानही एकमेकांवर बॉम्ब टाकत आहेत व हे दोन्ही देश भारताच्या दारात आहेत. पर्यावरण पूर्णपणे नष्ट होईल अशी ही स्थिती आहे. जल, वायू परिवर्तनाची वाट अधिक सहजसोपी करणारी व मानवजात आणि इतर प्राणिमात्रांच्या पिढ्या, वंश नष्ट करणारी ही युद्धस्थिती निर्माण झाली आहे. भारतासारख्या देशात पर्यावरणाबाबत आधीच दिव्याखाली अंधार आहे. उद्योगपतींच्या फायद्यासाठी जंगले, डोंगर तोडली जात आहेत. समुद्र, नद्या बुजवून इमारती उभ्या केल्या जात आहेत. त्या बदल्यात लाखो-कोट्य़वधी झाडे लावण्याच्या थापा राज्यकर्ते मारतात, पण इतकी झाडे लावायला जमीन कोठे आहे? पाणी कोठे आहे? खाण उद्योगाने पर्यावरणाचा रोज खात्माच चालवला आहे. राज्यांची व देशाची पर्यावरण मंत्रालये फक्त बेकायदा कृत्यास मंजुरी देणारी व त्यातून पैसे गोळा करणारी व्यापारी केंद्रेच बनली आहेत. पर्यावरणाबाबतचे गुन्हे व खटले आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालवायला हवेत. युद्ध हा अपराध आहेच. युद्धामुळे निर्माण होणाऱ्या ‘अॅसिड पाऊस’सारख्या घटना या पर्यावरण अपराधाच्याच तोडीच्या आहेत.
एक दिवस सूर्यही जळून जाईल इतके तापमान वाढेल. काळे ढग तेजस्वी सूर्यालाही काळवंडून टाकतील.
अॅसिडचा पाऊस हाहाकार माजवेल.
युद्धखोर राष्ट्रांना याचा जाब कोण विचारणार?
ट्विटर – @rautsanjay61
Gmail – [email protected]
Comments are closed.