धनखड अन् राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पडद्यामागे गुप्त हालचाली, पंतप्रधान मोदींना कुणकुण लागताच

संजय राऊत: उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांनी अचानक राजीनामा दिला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दैनिक सामनाच्या रोखठोकमधून खळबळजनक दावा केलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपच्या संघर्षामुळे जगदीप धनखड हे पदावरून गेले, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) यांनी धनखड यांना हटवलं. मोदींना वाटणारी असुरक्षितता हे देखील मोठं कारण आहे. सपाच्या रामगोपाल यादवांचे भाकीत खरं ठरला आहे असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. धनखड यांच्या इतकी लाचारी भाजपचे लोक देखील करायचे नाहीत, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केले आहे.

नरेंद्र मोदी यांनीच जगदीप धनगड यांना उपराष्ट्रपतीपदी आणलं. आता मोदींनीच त्यांना घालवलं. धनखड यांना घालवण्यामागे मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातला संघर्ष आहे  आणि मोदी यांना वाटणारी असुरक्षितता हे एक मोठे कारण आहे. धनखड हे राज्यसभेचे चेअरमन झाल्यावर त्यांचे वर्तन हे अत्यंत लाचारीचे होते. तेव्हाच समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव म्हणाले ये आदमी कार्यकाल पुरा नहीं कर पायेगा. धनखड व सरसंघचालक मोहन भागवत यांच्यातील जवळीक या काळात वाढली. संघ आणि धनखड यांच्यात शिजत असलेल्या खिचडीमुळे मोदी कमालीचे नाराज होते. उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्यामागे दिल्लीच्या पोटातील खळबळ बाहेर आली. भाजपात सगळे आलबेल नाही हे स्पष्ट झालं, असा टीका संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून केली आहे.

नेमकं काय म्हटलंय रोखठोकमध्ये?

पंतप्रधान मोदी यांनीच नियुक्त केलेले आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गेल्या दहा वर्षांच्या मोदी काळातील दिल्लीत घडलेली ही महत्त्वाची घडामोड आहे. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. पहिल्याच दिवशी 21 तारखेला संध्याकाळी साधारण पाच वाजेपर्यंत उपराष्ट्रपतींची प्रकृती ठणठणीत होती. पाचनंतर भाजप वर्तुळात असे काय घडले की, पंतप्रधान मोदींचा संदेश आला व प्रकृतीचे कारण सांगून धनखड यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवला. धनखड यांची प्रकृती बरी नसल्याचे एकही लक्षण त्या दिवशी राज्यसभेच्या कामकाजात आढळले नाही (उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात).

11 वाजता नेहमीप्रमाणे कामकाज सुरू झाले. साडेअकरा वाजता विरोधी पक्षनेते श्री. खरगे यांनी पहलगाम हल्ला व ‘आपरेशन सिंदूर’बाबत त्यांची भूमिका मांडायला सुरुवात केली. सत्ताधाऱ्यांनी गोंधळ सुरू केला. खरगे यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच त्यांचा माईक नेहमीप्रमाणे बंद केला. धनखड ‘नार्मल’ असल्याचे हे लक्षण मानायला हवे. खरगे बंद माईकसमोर बोलत असताना भाजप अध्यक्ष डा. नड्डा उभे राहिले. त्यांनी ओरडून सांगितले, “खरगेजी, तुम्ही जे बोलताय त्यातले काहीच रेकार्डवर जाणार नाही. मी बोलतोय तेच रेकार्डवर जाईल.” हे वक्तव्य म्हणजे सभापतींच्या अधिकारावर थेट आक्रमण होते. नड्डा यांच्या वक्तव्याने राज्यसभा अवाक् झाली. गोंधळात सभागृह संपवले. त्यानंतर सभापतींनी बोलावलेल्या कामकाज सल्लागार बैठकीत सगळे सामील झाले. सरकारतर्फे संसदीय कार्यमंत्री नड्डा व संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू उपस्थित राहिले नाहीत. बैठकीस जाऊ नका, अशा स्पष्ट सूचना या दोघांना दिल्या. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात तेव्हा मोदी, शहा, राजनाथ सिंह, नड्डा यांची बैठक सुरू होती व त्यानंतर उपराष्ट्रपतींची विकेट पडली!

जगदीप धनखड हे राज्यसभेचे सभापती म्हणून पंतप्रधान मोदींची खास पसंत होती. प. बंगालचे राज्यपाल म्हणून धनखड यांनी मोदींना जसे हवे तसेच ‘काम’ रेटले. ममता बानर्जी व त्यांच्या बहुमतातील सरकारची वेळोवेळी कोंडी करून धनखड यांनी मोदींकडून पाठ थोपटून घेतली आणि त्याच धनखडना उपराष्ट्रपती पदाची बक्षिसी दिली; पण कार्यकाल पूर्ण होण्याआधीच धनखड यांना जावे लागले ! समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रा. राम गोपाल यादव हे राज्यसभेत माझ्या बाजूलाच बसतात. धनखड हे राज्यसभेचे ‘चेअरमन’ झाल्यावर त्यांचे वर्तन हे अत्यंत लाचारीचे होते. तेव्हा श्री. यादव मला म्हणाले, “ये आदमी अपना कार्यकाल पुरा कर नहीं पायेगा.” मी विचारले, “असे का म्हणता?” यावर प्रा. यादव म्हणाले, “मूळ भाजपाचे असलेले लोकही इतकी लाचारी करत नाहीत. हे जरा जास्तच लाळ घोटत आहेत.” प्रा. यादव यांचे भविष्य अशा पद्धतीने खरे ठरले.

उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्याने दिल्लीच्या पोटातील खळबळ बाहेर आली. भाजपात सगळे आलबेल नाही हे स्पष्ट झाले. मोदींनीच धनखड यांना आणले व मोदींनीच घालवले. सप्टेंबर महिन्यात मोदी 75 वर्षांचे होतील व त्यांनीच केलेल्या नियमानुसार मोदी यांना पंतप्रधान पद सोडावे लागेल. तर मोदींचा वारस कोण? यावर भाजपातच चर्चा सुरू झाली आहे. त्याआधी मोदी उपराष्ट्रपती पदावर कोणाला बसवतात हे पाहायला हवं. राजनाथ सिंहांपासून राज्यपाल मनोज सिन्हांपर्यंत नावे चर्चेत आहेत. मोदी यांच्यानंतर अमित शहांना त्यांच्या खुर्चीवर बसायचे आहे, पण स्वतः मोदीच अमित शहांना विरोध करतील. भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानेच मला हे सांगितले. गुजरातच्या दोन नेत्यांतले संबंध आता वरवरचेच राहिले आहेत. पूर्वीचा गोडवा आता राहिलेला नाही. पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा असलेल्या एखाद्या नेत्यास मोदी उपराष्ट्रपतीपदी बसवतील अशी दिल्लीची हवा आहे व या सर्व घडामोडीत अमित शहा मला कोठेच दिसत नाही, असे दैनिक सामनाच्या रोखठोकमध्ये म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=Qstdhh_4f9y

आणखी वाचा

Hasan Mushrif on Farmers Loan waiver: मी मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये अनुदान देईन: हसन मुश्रीफ

आणखी वाचा

Comments are closed.