Sanjay Raut said that there is a situation to impose President rule in Beed PPK
बीडच्या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा सरकारवर निशाणा साधला आहे. बीडमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
मुंबई : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये असलेल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गावगुंडांकडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटल्याचे पाहायला मिळत आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. ज्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशी आणि न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, बीडमधील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून सरकारवर तर निशाणा साधलाच आहे. परंतु, बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. (Sanjay Raut said that there is a situation to impose President rule in Beed)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार दररोज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बीड आणि परभणीच्या घटनेवरून सरकारवर ताशेरे ओढत आहेत. त्यामुळे आता पुन्हा बुधवारी (ता. 25 डिसेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपावरून सरकारवर संताप व्यक्त केला आहे. याबाबत राऊत म्हणाले की, बीडची परिस्थिती अशी आहे की, एका जिल्ह्यात राष्ट्रपती शासन लागू करावे. आपल्या घटनेत तशी तरतूद नाही. मी परिस्थिती सांगतो. तिथे सामाजिक राजकीय परिस्थिती गंभीर आहे. तिथे दंगल होईल, लोक रस्त्यावर येतील अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी बीडला गेले पाहिजे. ते गृहमंत्री आहेत. त्यांच्या लाडक्या धनुभाऊला (मंत्री धनंजय मुंडे) घेऊन जावे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा आक्रोश जर या सरकारला दिसत नसेल तर हे सरकार माणुसकी शुन्य आहे. त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही, असा राग राऊतांनी व्यक्त केला.
– Advertisement –
हेही वाचा… Sanjay Raut : सरकार लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारुडे बनवणार, राऊतांची जहरी टीका
तर, बीड आणि परभणीमध्ये ज्या घटना घडल्या आहेत. त्यावर फडणवीस थातूरमातूर उत्तर देत आहेत. थातूरमातूर हा शब्द योग्य आहे. सरकारचे मंत्री बीडला जात आहे. काय काम आहे तिथे? बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात. तुमच्या खात्यात. परभणीचा आरोपी अजूनही पोलीस खात्यात. ज्याने कस्टडीत सोमनाथ सूर्यवंशीला मारले. ते पोलीस खात्यात तुम्हाला सलाम करत आहेत. आणि मंत्री जाऊन बीडमध्ये नौटंकी करत आहात हे तुम्हाला शोभते का? असा सवालही यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून भाजपा किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय उत्तर देण्यात येते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments are closed.