मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्यांचाच महापौर होणार – संजय राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका, शिवसेना-मनसे युती, मुंबईचा महापौर अशा विविध विषयांवर मत मांडले. ”दिल्लीचे जोडे उचलणारा कुणीही मुंबईचा महापौर होणार नाही तर मुंबईचा महापौर हा मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्यांचाच होणार”, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.
पुढे ते म्हणाले, ”कोणी कितीही देव पाण्यात बुडवून बसले असले तरी आता बात बोहोत दूर तक चली गई है. प्रकरण फार पुढे गेलंय. माघारीचे दोर नाहीत आता. त्यामुळे कुणी कुठल्या मेळाव्यात काय वक्तव्य केलं तरी तुमच्या छाताडावर पाय ठेवून ठाकरे बंधू याक्षणी उभे राहायच्या मनस्थितीत आहेत. काल ते एका कौटुंबिक कार्यक्रमाला एकत्र आले. तिथून ते एकत्र मातोश्रीवर गेले. तिथे त्यांच्यात राजकीय चर्चाच झाली. मुंबईसह महाराष्ट्रात 27 महानगरपालिका आहेत. हा खेळ आहे नाहीये. प्रत्येक जागेवर, पॅनेलवर चर्चा व्हायला हवी. प्रत्येक महानगरपालिकेची परिस्थिती वेगळी आहे. या सगळ्यावर चर्चा होतेय. प्रत्येक महानगरपालिकेत पक्षाचे महत्त्वाचे नेते चर्चा करतायत. या चर्चांचा अंतिम टप्पा गाठलाय”, असे संजय राऊत यांनी सांगितले.
”मुंबईचा महापौर मराठी होईल, तो अस्सल भगव्या रक्ताचा, मराठी बाण्याचा असेल. मिंधे भाजपसारखे नाही. दिल्लीचे जोडे उचलणारा कुणीही महापौर होणार नाही. जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या 10५ हुतात्म्यांसमोर साष्टांग दंडवत घालेल व महाराष्ट्राची गर्जना करेल तो महापौर होईल. ते रक्त, तो बाणा फक्त शिवसेना व मनसे मध्ये आहे. मराठीसाठीच निर्माण झालेले व मराठी अस्मितेसाठीच लढणारे हे दोन पक्ष आहेत. त्यामुळे आमचाच महापौर होईल. ठाकरे बंधूंचाच महापौर होईल. ही युती वेगळी आहे. तन, मन, धन, दिल और दिमागसे हुई युती है”, असेही संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.