विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर हक्क सांगणार – संजय राऊत

महाराष्ट्राच्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर हक्क सांगण्यात येणार आहे. विधानसभेत सध्या शिवसेनेचे 20 आमदार आहेत. शिवसेना खासदार, नेते, संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

”विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदावर शिवसेना आपला हक्क सांगणार आहे. आमदारांची संख्या कमी असली तरी घटनेत असं कुठेच लिहलेलं नाही, की विरोधी पक्ष नेत्याशिवाय संसद आणि लोकसभा चालावी. शिवसेनेचं संख्याबळ वीस आहे. या आधी या पेक्षा कमी संख्या असताना देखील त्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळालं आहे. आमचं एकत्रित संख्याबळ 50च्या वर आहे. त्यामुळे जे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांना घटना, संविधान, लोकशाही याच्याविषयी जाण असेल असे आम्ही मानतो व त्यामुळे ते आमची भूमिका मान्य करतील, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदारांची नुकतीच बैठक झाली असून आज खासदारांची बैठक होणार आहे. त्याविषयी संजय राऊत म्हणाले. ”काल आमच्या आमदारांची बैठक झाली, आज खासदारांची बैठक आहे. परवापासून विधानसभेचे अधिवेशन आहे. साधारण आठ दिवसांनी संसदेचे अधिवेशन आहे. त्यानिमित्ताने आमदार खासदारांना दिशा मिळावी त्यासाठी या बैठका होत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.