जुलमी सत्तेविरुद्ध लढणाऱ्या सर्वांचा हा संघर्ष -संजय राऊत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘अनलाईकली पॅराडाईज’ हे पुस्तक माझे एकटय़ाचे नाही. जुलमी सत्तेविरूद्ध लढणाऱया सर्वांचा हा संघर्ष आहे. माझ्या मराठीतील पुस्तकाबद्दल बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते की, हे पुस्तक म्हणजे रडगाणे नाही, तर संघर्षाची गाथा आहे आणि ते खरेच आहे. मंचावर बसलेले लोक हिंमतबाज आहेत, तर मंचापुढचेही लोक तितक्याच हिमतीचे आहेत. ‘अनलाईकली पॅराडाईज’ ही निर्दोष राजकीय कैद्याची संघर्षगाथा आहे, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

मराठीतील ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर देशपातळीवर हे पुस्तक पोहचवले जावे, अशी मागणी मोठय़ा प्रमाणावर होती. त्यामुळे आज हे पुस्तक हिंदी व इंग्रजीत आले आहे, असे त्यांनी सांगितले. मनोधैर्य खच्ची करण्यासाठी आम्हाला तुरुंगात ठेवले. मात्र, मी त्यातून तावूनसुलाखून बाहेर निघालो. तुरुंगात असताना ईडीचे अधिकारी नजरेला नजर मिळवू शकत नव्हते, अशी आठवणही राऊत यांनी सांगितली. मी तुरुंगातून बाहेर आलो तर देशच तुरुंग झाल्यासारखी स्थिती जाणवली. माझा लढा हा लोकशाही वाचविण्यासाठी होता. ईडीची भीती माझ्या तुरुंगवासानंतर जवळपास संपली, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला. आज ज्या मावळणकर सभागृहात कार्यक्रम होत आहे ते लोकसभेचे पहिले अध्यक्ष हे निष्पक्ष लोकशाहीचे मानदंड होते. आज देशात लोकशाही वाचविण्यासाठी लढावे लागत आहे. त्यासाठी सगळय़ांनीच एकत्र यायला हवे, असे आवाहनही राऊत यांनी केले.

येथे चार जण तुरुंगात जाणारे… एकजण त्यांना बाहेर काढणारे!

पुस्तक प्रकाशन सोहळय़ाच्या मंचावर ईडीच्या वक्रदृष्टीमुळे तुरुंगात जाणारे चार नेते उपस्थित होते. त्याचा उल्लेख संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत केला. इथले माझ्यासकट साकेत गोखले, केजरीवाल व संजयसिंह असे चौघे ईडीच्या राजकीय सूडद्धीच्या कारवाईने तुरुंगात गेलो. मात्र, आम्हा चौघांना बाहेर काढणारेही महनीय व्यक्ती इथे उपस्थित आहेत ते म्हणजे कपिल सिब्बल. राऊतांच्या या फटकेबाजीने मावळणकर सभागृहात हास्याची कारंजी उडाली.

Comments are closed.