आम्ही जिवंत आहोत आणि तुमच्या छाताडावर बसलोय, ‘हंबरडा मोर्चा’पूर्वी संजय राऊत यांची फटकेबाजी, फडणवीसांवर घणाघात

अस्मानी-सुलतानी संकटाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी छत्रपती संभाजीनगरातील विभागीय आयुक्तालयावर शिवसेना ‘हंबरडा मोर्चा’ काढून धडक देणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे करणार असून मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. आम्ही जिवंत आहोत आणि तुमच्या छाताडावर बसलोय. त्यामुळे तुम्हाला आमची भीती वाटतेय, असे राऊत शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी असलेल्या मोर्चावर अशा प्रकारची टीका-टिप्पणी करणे हा या महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे. आजचा मोर्चा हा शेतकऱ्यांचा हंबरडा फडणवीस यांच्यासमोरच नाही तर दिल्लीपर्यंत पोहोचा यासाठी आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक, हालअपेष्टा सुरू आहे. सुलतानी आणि अस्मानी दोन्ही संकटाशी मराठवाड्यातील शेतकरी सामना करत असताना पॅकेजच्या नावाखाली धुळफेक केली आहे. देवेंद्रजींनी 31 हजार कोटींचे पॅकेज आणले. पण हे पॅकेज फार तर साडे पाच ते सहा हजार कोटींचे आहे. बाकी सगळी धुळफेक आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

शिवसेनेचा मोर्चा प्रचंड होईल. आमचा आक्रोश, हंबरडा देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेला तर त्याच्यावर विचार करतील. पण भाजप हा निगरगट्ट मनाचा, ठेकेदारांचा पक्ष आहे. त्यांना शेतकऱ्यांची काय चिंता आहे? असा सवालही राऊत यांनी केला.

शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी देण्यात यावी आणि कर्जमाफी करावी ही आमची मागणी आहे. या मागणीसाठी आणि मराठवाड्यातील, राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा आम्ही काढत असून आम्ही जिवंत आहोत आणि तुमच्या छाताडावर बसतोय. म्हणून तुम्हाला भीती वाटतेय, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Comments are closed.