Sanjay Raut Shivsena UBT criticized CM Fadnavis and commented on Maharashtra Police
मुंबई : धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात कोट्यावधींचे घबाड सापडल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या सर्व प्रकरणावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी (23 मे) खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. धुळ्यामध्ये पाच कोटी रुपये सापडले, तिकडे ईडी का पोहोचली नाही? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. पाच-पन्नास हजारांची चौकशी ईडी करते, मग गुरुवारी विधिमंडळ समितीच्या अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाकडे 5 कोटी रुपये सापडले, तिथे ईडी का पोहोचली नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Sanjay Raut Shivsena UBT criticized CM Fadnavis and commented on Maharashtra Police)
हेही वाचा : Sushma Andhare : हे फोटो गर्दीत काढलेले नाही तर…, हगवणे कुटुंबीयांचे राजकीय लागेबांधे अंधारेंकडून उघड
“धुळे प्रकरणात जर विरोधी पक्षाचा कोणता व्यक्ती असता, तर ईडीच्या अधिकारी कोट आणि टाय लावून तेथे पोहोचले असते. ईडी म्हणजे मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या पिंजऱ्यातील पोपट आहे.” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अंदाज समितीच्या अधिकाऱ्याच्या खोलीमध्ये सापडलेल्या रक्कम प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यापेक्षा गुन्हा दाखल केला असता, त्या स्वीय सहाय्यकाला ताब्यात घेतले असते तसेच तपास ईडीकडे वर्ग केला असता, तर आम्हाला आनंद झाला असता.” असे म्हणत टोलाही लगावला. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस कोणाला वाचवत आहेत? असा सवाल खासदार राऊत यांनी यावेळी केला आहे.
“धुळे प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीला काळमर्यादा का नाही? त्यांच्या तपासाच्या चौकटी काय आहेत? ते अद्याप आम्हाला समजलेले नाही. त्यांच्या कालावधीमध्ये ही समिती ज्या-ज्या ठिकाणी गेली, तिथे ते कोणत्या हॉटेलमध्ये किंवा विश्रामगृहात याच महाशयांनी आपल्या बॉससाठी पैसे जमा केले, याची माहिती फडणवीस यांना हवी असेल तर ती मी त्यांना द्यायला तयार आहे,” असे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. “दोन कोटी रक्कम तर शुल्लक आहे. यापेक्षा मोठी रक्कम जमा करण्याचे टार्गेट देण्यात आले होते,” असा दावा त्यांनी केला आहे.
“धुळे प्रकरणात आरोपी घाई घाईत रक्कम घेऊन पळत होता. त्यावेळी त्याने जाताना गाडीमध्ये बॅगा भरल्या. त्यावेळी तो साडे 5 कोटी घेऊन गेला होता. त्यांना 5 ते साडे 5 कोटींचे टार्गेट पूर्ण करायचे होते. उरलेली रक्कम जालन्यात जमा करायची होती. कदाचित ती जमा झाली असेल. पण, फक्त उरलेली रक्कम हाती लागली आहे,” असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. चोर कधी चोरी कबूल करत नाही. त्यामुळे हे सर्व चोर आहेत, असा घणाघात त्यांनी यावेळी केला आहे. या प्रकरणात एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर यांच्याकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असा संशयही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
Comments are closed.