पाकिस्तान, PoK ताब्यात घेणं हे अमित शहांना शक्य नाही; तिथे ED-CBI-EC चालत नाही, संजय राऊत यांचं टिकास्त्र
अमित शहा यांनी खूप काही ठरवले होते. पाकिस्तान ताब्यात घ्यायचा, चून चून के मारेंगे… पण काही झाले का? कारण हे निवडणूक आयोगाच्या हातात नाही. पाकिस्तान ताब्यात घेणे, पीओके ताब्यात घेणे किंवा दहशतवाद्यांना मारणे हे ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोगाच्या ताब्यात असते तर ते करू शकले असते. पण त्यांना ते शक्य नाही. त्यांची मजल काय हे कालच्या युद्धात दिसून आले. हे किती डरपोक आणि ढोंगी आहेत हे काल दिसले. यांचा पक्षही प्रे. डोनाल्ड ट्रम्प चालवत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. ते नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधत होते.
मंगळवारपासून नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत अवकाळी पाऊस राज्यातील महापालिकांची स्थिती प्रशासनाचा कारभार कुंभमेळा व्यवस्थापन राज्यातील राजकीय वातावरण अशा विविध प्रश्नांना उत्तरे दिली. अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्यावरून विचारलेल्या प्रश्नासंदर्भात संजय राऊत यांनी सविस्तर उत्तर दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू असून महाराष्ट्र अजित पवार, तर दिल्ली सुप्रिया सुळेंनी सांभाळावी अशी योजना आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, ही त्यांची आधीपासूनच योजना आहे. त्यात नवीन काय आहे. महाराष्ट्र अजित पवारांनी सांभाळावा आणि सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत काम करावे. शरद पवारही दिल्लीत काम करताहेत. पण अजित पवार गटाने ती जबाबदारी दाऊद इब्राहिमला दिलेली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्याच्यामुळे सुप्रिया सुळे कुठे आल्या यात? मूळ पक्ष शरद पवार यांचाच आहे, अजित पवार हा एक फुटलेला गट आहे. मूळ शिवसेना ही उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेबांची आहे. शिंदे हा एक फुटलेला गट आहे. अमित शहांनी ठरवले म्हणून लोक ते स्वीकारणार नाही, असेही राऊत यांनी ठणकावून सांगितले.
राज ठाकरे मुक्त विद्यापीठ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याबाबत विचारले असता राऊत यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली. मुक्त विद्यापीठात कुणीही जाऊन पदवी घेऊ शकतो. ओपन आहे ते, तिथे खिचडी पण मिळते, पदवी पण मिळते. मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील तर हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात एक प्रस्ताव मांडला होता. आम्ही त्याला एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि देत राहू. फक्त आमची एक भूमिका अशी आहे की, ज्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या, महाराष्ट्र द्रोहाच्या भूमिका घेतल्या आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवता कामा नये, असे राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे-अजित पवार यांना चपराक
अजित पवार हे अमित शहा यांच्या मदतीने शरद पवार यांचा पक्ष पळवून घेऊन गेलेले आहेत. मी नेहमी राज ठाकरे आणि नारायण राणे यांचे कौतक करतो. नारायण राणे यांनी पक्ष सोडला आणि स्वत:चा पक्ष स्थापन केला. ही माझी शिवसेना, मीच शिवसेना प्रमुख हा दावा नारायण राणे यांनी कधी केला नाही. त्यांना पक्ष चालवायला जमले नाही, ते दुसऱ्या पक्षात गेले आणि त्यांनी राजकारण सुरू केले. राज ठाकरे यांनी स्वत:चा पक्ष काढला. तेव्हा त्यांचे आणि आमचे मतभेद झाले, पण त्यांनी स्वत:चा पक्ष काढून राजकारण केले. एकनाथ शिंदेप्रमाणे त्यांनी माझी शिवसेना खरी, मीच बाळासाहेब ठाकरे हे सांगितले नाही. अजित पवार सांगताय की, मीच खरा. पक्षाचा बाप, जन्मदाता तुमच्या व्यासपीठावर बसला आहे आणि तुम्ही म्हणताय मी राष्ट्रवादीला जन्म दिला, ही भूमिका अजित पवारांना कळत नसेल तर ते रेम्या डोक्याचे आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.
Comments are closed.